Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा भाषणादरम्यान लोकांकडून येणाऱ्या प्रश्नांना अजित पवार हे उत्तर देत असतात. तसेच सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या त्या प्रश्नांची दखल घेण्यास भाग पाडत असतात. मात्र काहीवेळा नागरिकांच्या समस्यांच्या भडीमारामुळे अजित पवार यांनाही संयम सुटतो आणि ते कार्यकर्त्यांना सुनावतात. मात्र असं करतानाही पुढच्याच क्षणी त्याविषयी मार्ग काढण्याचेही आश्वासन देतात. असाच अनुभव आज सुपेकरांना आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीमधील सुपे तालुक्याच्या दौऱ्यावर होते. टी.सी.एस. फाऊंडेशनच्या सी.एस.आर. निधीतून जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या उजवा कालवा रायझिंग ते बोरकरवाडी तलावपर्यंत करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी लोकांशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. मात्र वारंवार स्पष्टीकरण देऊनही तक्रार करणारी व्यक्ती थांबत नसल्याने अजित पवारांनी चांगलेच सुनावले.
नदीच्या कॅनॉलऐवजी बंद पाईपलाईन करण्यावरुन अजित पवार माहिती देत होते. त्यावेळी एका व्यक्तीने अधिकाऱ्यांना पाहणी करायला सांगा असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी तू तर माझा सल्लागार आहेस असं म्हटलं. त्यानंतर त्या व्यक्तीने पुन्हा पाणी वाया जात असल्याचे म्हटलं. त्यावर अजित पवार संतापले. तू जरा वेडा आहेस का, जरा क्रॅक आहेस का डोक्याने. मी मगासपासून सांगतोय की, आम्ही त्या ठिकाणी बंद पाईपलाईन करणार आहे. ती करताना कुठे पाण्याचे लिकेज आहे ते काढणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
त्यावर त्या व्यक्तीने जरा लवकर काम करा असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी, 'ती काय जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात,' असं म्हटलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं - अजित पवार
"मी त्या एका रस्त्याबद्दल सांगितलं आहे. त्याबद्दल सहकार्य करा. मी बीडीओला सांगितलं आहे, तहसीलदाराला सांगितला आहे, पीआयला सांगितला आहे. काकालाही म्हणलं विश्वासात घ्या, कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे काहीच चालत नाही," असंही अजित पवार म्हणाले.