जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवारांनी फक्त दोन शब्दात दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:43 AM2024-01-05T10:43:37+5:302024-01-05T10:45:37+5:30
नागरिकांनीही सर्व नियम पाळून याला प्रतिसाद दिला पाहिजे. यापूर्वी जसे सहकार्य केले तसे आताही सहकार्य केले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले....
पुणे : कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच याबद्दलच्या सूचना राज्यातील सर्व सिव्हिल सर्जनला देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही सर्व नियम पाळून याला प्रतिसाद दिला पाहिजे. यापूर्वी जसे सहकार्य केले तसे आताही सहकार्य केले पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, मास्क वापरण्यासाठीच्या नियमांबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.
पाण्याबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, रब्बीचा हंगाम संपल्यानंतर कालवा समितीची बैठक घेतली जाईल. त्यामध्ये किती बाष्पीभवन झालं, किती पाणी शेतीला गेलं, किती पाणी पुणेकरांना लागेल हे सगळं पाहून पुढची तयारी करण्यात येईल.
जितेंद्र आव्हाडांवर काय म्हणाले अजित पवार?
जितेंद्र आव्हाडांनी प्रभु रामाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर अजित पवारांना विचारल्यावर त्यांनी 'नो कंमेंट' म्हणत उत्तर दिले. पक्षफुटीच्या अगोदर अजित पवार पक्षातील नेत्यांवर दादागिरी करायचे असं आव्हाड म्हणाले होते. यावर विचारले असता पवार म्हणाले, त्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष या नात्यानं उत्तर दिलेले आहे. मी कामाचा माणूस आहे, त्यामुळे असल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही, असं पवार म्हणाले.