पुणे: देशातील कोरोना परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गैरहजर राहिले होते. यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. मुख्यमंत्र्यावर केल्या जाणाऱ्या टीकेचा उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी समाचार घेतला आहे. याविषयी पुण्यात बोलताना ते म्हणाले की, 'मीटिंग घेतली म्हणजे प्रत्येकाने उपस्थित रहायलाच पाहिजे असं काही नाही'.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, 'कधी कुणाला अडचण असते. कोरोनामुळे कुणी क्वारंटाईन असू शकतं किंवा आणखी काही अडचणी असू शकतात. मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहता येत नसल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी हजर राहणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्य सल्लागार सिताराम कुंटे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित नव्हते म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा किंवा राजकारण करण्याचं काहीच कारण नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम अतिशय उत्कृष्ट पणे सुरु आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या टीमचे सहकारी या नात्याने काम करतोय. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलामुलींचे वॅक्सिन घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी वॅक्सिन कमी पडतंय, हे वॅक्सिन मागावे याची चर्चा कॅबिनेटच्या बैठकीत झाली होती. 60 वर्षावरील व्यक्तींना बूस्टर डोस घेण्याची वेळ आलीच तर त्यासाठी आपल्याला वॅक्सिनची गरज आहे. वॅक्सिनची मागणी करण्याचा आधीच ठरलं होतं. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत ती मागणी देखील करण्यात आली.