राजकारणातून संन्यास घेणार अजित पवार?; पार्थलाही दिला शेती-उद्योगाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 09:51 PM2019-09-27T21:51:58+5:302019-09-27T21:52:47+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समोर आलं नसलं, तरी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या संदर्भात एक अंदाज वर्तवला आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समोर आलं नसलं, तरी त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्या संदर्भात एक अंदाज वर्तवला आहे. 'शिखर बँक घोटाळ्यात माझंही नाव आल्यानं, ईडीने गुन्हा दाखल केल्यानं अस्वस्थ, उद्विग्न होऊन अजितदादांनी राजीनामा दिला असावा', असं पवारांना वाटतंय. अजित पवारांनीपार्थ पवार आणि अन्य कुटुंबीयांशी जो संवाद साधला, त्या आधारे पवारांनी हा अंदाज बांधला आहे. याच संवादावरून एक धक्कादायक शक्यताही निर्माण झाली आहे. अजित पवार राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात असल्याचे संकेत त्यांच्या एकंदर बोलण्यातून मिळत आहेत.
'अलीकडे राजकारणाची पातळी अत्यंत घसरलेली आहे. त्यामुळे आपण यातून बाहेर पडलेलं बरं. आपण शेती किंवा एखादा उद्योग करू. अशा शब्दांत अजित पवार यांनी घरच्यांपुढे मन मोकळं केल्याचं पार्थ पवार यांनी आजोबा शरद पवारांना सांगितलं. तुम्हीसुद्धा राजकारणात जाऊ नका. त्यापेक्षा व्यवसाय केलेला बरा, असा सल्लाही त्यांनी मुलांना दिलाय. वास्तविक, अजित पवार धडाकेबाज नेते म्हणून ओळखले जातात. अनेक राजकीय संकटं त्यांनी पेलली आहेत, परतवून लावली आहेत. अशा पद्धतीची भाषा त्यांनी याआधी कधी केल्याचं ऐकिवात नाही. त्यांच्या वाक्यांमधून 'भैरवी'चा सूर स्पष्ट जाणवतो. या संवादानंतर लगेचच त्यांनी आमदारकीचा राजीनामाही दिलाय. त्यामुळे ते राजकारणापासून दूर जाणार का, संन्यास घेणार का, याबाबत चर्चांना वेग आला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी अजित पवार नॉट रिचेबल; शरद पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषदhttps://t.co/HdIh6S2jZD@NCPspeaks@AjitPawarSpeaks@PawarSpeaks
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2019
अर्थात, तलवार म्यान करण्याचा, लढाई सोडण्याचा अजित पवारांचा स्वभाव नाही, असं नमूद करत शरद पवारांनी अजितदादांच्या निवृत्तीची शक्यता फेटाळून लावली आहे. एखादी गोष्ट पटली नाही तर स्वच्छ भूमिका घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. अस्वस्थतेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असेल, पण कुटुंबप्रमुख या नात्याने आपण त्यांची समजूत घालू, असं पवारांनी ठामपणे सांगितलं. मी एखादी गोष्ट सांगितली आणि त्याने नकार दिला असं झालेलं नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
का, कधी, कसं, कुठे?... कुछ तो गडबड है... #AjitPawar#SharadPawar@NCPspeaks@AjitPawarSpeakshttps://t.co/8CUXGZxYfu
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2019