बारामती : माळेगाव कॉलनी येथे रस्त्यावर अपघातग्रस्त व्यक्ती अढळून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला ताफा थांबवत अपघातग्रस्ताला तातडीने बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्याची सोय केली. तसेच कार्यक्रमात व्यस्त असलेल्या अजितदादांनी नंतर देखील आठवणीने त्या अपघातग्रस्ताच्या प्रकृतीची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली.
व्यस्त दिनक्रमातून आपला माळेगाव येथील दौरा करून उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (दि. १०) बारामतीच्या दिशेने येत होते. यावेळी माळेगाव कॉलनी येथे पवार यांना रस्त्यावर अपघात झाल्याचे निदर्शनास आले. पवार यांनी तातडीने आपला ताफा थांबवत अपघातग्रस्ताला रूग्णालयात दाखल करण्यासाठी ताफ्यातील चारचाकीची सोय केली. सहा वाजल्यापासून बारामती तालुक्यात अजित पवार यांचे विविध ठिकाणच्या पाहणी, उद्घाटन, भेटी व भूमीपूजनाचे कार्यक्रमा निमित्त बारामती दौरा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान दुपारी अकरा वाजता माळेगाव येथील पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यक्रमास त्यांनी उपस्थिती लावली. हा कार्यक्रम आटोपून बारामतीतील एका शोरूमच्या उद्घाटनासाठी पवार हे बारामतीकडे निघाले होते. त्याच वेळी त्यांच्या वाहनांचा ताफा शारदानगर नजीक आला असता माळेगाव कॉलनी येथे बारामती-नीरा रस्त्यावर एका वाहनाचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी तातडीने आपल्या वाहनांचा ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांना मदत करण्याची सूचना केली. यानंतर बारामतीचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्या वाहनातील लोकांना बसण्याची व्यवस्था करून त्या अपघातग्रस्तांना त्या वाहनातून बारामतीतील रूग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. त्यानंतर बारामतीतील रूग्णालय प्रशासनाशी संपर्क साधत पवार यांनी त्या अपघातग्रस्तांवर उपचार करण्याची सूचना केली.