पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांना महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करण्याची सवय होती,पालकमंत्री असताना त्यांनी फोनवरून महापालिका व जिल्हा परिषद चालवली. त्यामुळे सध्या पवार त्यांच्या कर्माची फळे भोगत असल्याची टीका पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा येत्या सोमवारी (दि.23)पुण्यात येणार असून भाजपच्या प्रचाराचा नारळ नड्डा यांच्या हस्ते फुटणार असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बापट यांनी ही टिका केली. यावेळी भाजपच्या शहर अध्यक्ष व आमदार माधुरी मिसाळ ,लक्ष्मण जगताप,अॅड.उज्ज्वल केसकर आदी उपस्थित होते.
भाजपच्या कारभारावर टीका करत अजित पवार यांनी मी पालकमंत्री असताना पुण्याला पाणी कमी पडू दिले नाही,असे पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात सांगितले. त्यावर बापट म्हणाले, पालकमंत्री असताना मी कधीही पुणेकरांना पाणी कमी पडू नये याची काळजी घेतली. तसेच सध्या पुण्यासाठी समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. नवीन पाईपलाईन टाकल्या जात असून 110 पैकी 83 टाक्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा पाणी प्रश्न सुटेल.या कामात अडथळा आणणा-यांवर पक्षाच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाईल.
महापालिकेच्या कामकाजात आमच्याकडे पालकमंत्री ढवळाढवळ करत नाही. महापौर, सभागृहनेते हे सर्वजण महापालिकेच्या कामाबाबत निर्णय घेतात.परंतु,पालकमंत्री शासनाकडे पालिकेचे महत्वाचे विषय घेऊन जातात.पालकमंत्री चंद्रकांत पाटील,असे काम करत आहे आणि मी सुध्दाच याच पध्दतीने काम केले.अजित पवार यांना फोनवरून महापालिका, जिल्हा परिषद चालवली. त्यांना हवे तसे निर्णय करून घेतले. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळेच सध्या पवार हे त्यांच्या कर्माची फळे भोगत आहेत,असे बापट यांनी सांगितले.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, जे.पी.नड्डा सोमवारी दुपारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत.तसेच जैन धर्मगुरू शिवमुनी यांची वर्धमान पूरम ,गंगाधाम येथे दुपारी भेट घेणार आहे.तसेच गणेश कला केंद्र येथे दुपारी 4.30 वाजता भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात लोकप्रतिनिधी,पक्षाचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत.