पुणे : लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर राज्यात आज चौफेर हल्ले होत आहेत. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होत असलेली गळचेपी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. सध्या घडत असलेल्या घटना पाहता अघोषित आणीबाणी येत आहे की काय असा प्रश्न पडत असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
पवार म्हणाले, सध्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जाणीवपूर्वक हल्ले सुरू आहेत. कोकणात पत्रकाराची हत्या झाली. मागील आठवड्यात एका पत्रकाराला मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते दम देतात. छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये खोके यावरून रॅप साँग करणाऱ्याला जेलमध्ये टाकले. खोका हा उल्लेख केला परंतु, त्याला अटक करून संबंधितांनी खोक्याचे एक प्रकारे समर्थन केले आहे. पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकाराला शाई फेकीच्या गुन्ह्यात गोवले गेले. तेव्हा पत्रकारांनी एकजूट केल्यावर त्या पत्रकाराला गुन्ह्यातून वगळले गेले. सुसंकृत महाराष्ट्रात हा प्रकार एक शोकांतिका असून, असे हिणकस प्रकार थांबले पाहिजेत. यासाठी सगळ्यांनी एकजूट करण्याची गरज आहे. म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकावता कामा नये. यापुढे पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित, ' धडपड ' या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ॲड. अमरसिंह जाधवराव, ज्ञानेश्वर भोईटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट, चंद्रकांत भुजबळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या लोकांची संघर्ष गाथा धडपड या पुस्तकामधून मांडली आहे. केवळ राजकारणी व्यक्तींच नव्हे तर समाजकारणात काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी हे पुस्तक आवश्य वाचावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांनी प्रास्ताविक केले, प्रदीप देशमुख यांनी सुत्रसंचालन केले.