माळेगाव, भीमाशंकरच्या बरोबरीत घोडगंगा ऊस दर देणार- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 01:23 AM2022-11-05T01:23:20+5:302022-11-05T11:25:06+5:30
जाती, पाती, नाती, गोत्यांचा विचार करू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले...
रांजणगाव सांडस (पुणे) : चुकीच्या लोकांच्या हाती कारखाना दिल्यामुळे थेऊर कारखाना, भीमा पाटस कारखान्याची दयनीय अवस्था झालेली आहे. पुढील पाच वर्षांत घोडगंगा सहकारी साखर कारखाना माळेगाव, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बरोबरीत दर देईल. कोणाला तिकीट मिळाले नसेल तर त्यांनी नाराज होऊ नये. जाती , पाती, नाती, गोत्यांचा विचार करू नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
मांडवगण फराटा येथे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शेतकरी विकास पॅनलने आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी, कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, ज्येष्ठ माजी संचालक झुंबर रणदिवे, सुजाता पवार, कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, मानसिंग पाचुंदकर, तालुका अध्यक्ष रवी काळे, संतोष रणदिवे, माजी दूध संघ संचालक जीवन तांबे, राहुल करपे-पाटील आदी उपस्थित होते.
अशोक पवार म्हणाले, दिवंगत माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या विचाराने या भागात चासकमान कालवा, घोड कालवा यामुळे या भागात पाणी आले. या भागातील शेतकरी ऊसशेती करू लागला. जिल्ह्याबाहेरील कारखाने या भागातील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जात होते; परंतु उसाला योग्य बाजार भाव मिळत नव्हता. म्हणून दिवंगत माजी आमदार रावसाहेब दादा पवार व त्यांच्या सहकार्याच्या प्रयत्नाने न्हावरे येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना होऊन १९९७ साखर पोते बाहेर पडले. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे चार पैसे मिळू लागले. राज्य सरकारने ६.३८ पैसे वीज खरेदी करार केला होता; परंतु प्रत्यक्षात ३ रुपये प्रति युनिट वीज खरेदी केल्यामुळे कारखान्याला आर्थिक तोटा सहन करावा लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, चासकमान, डिंबा, कुकडी, घोड नदीचे पाणी कॅनॉलद्वारे परिसरात आल्याने या भागात शेतकरी सुखी व संपन्न झाला. भाजप सरकारने साखर निर्यात बंदी घातली. त्यामुळे साखरेचे भाव खाली पडले.
फोटो