सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 11:40 AM2021-09-18T11:40:44+5:302021-09-18T11:42:21+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत.
बारामती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथे शनिवारी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही उत्तम प्रकारे चालवली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या पाच बँकामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश होतो. मात्र सहकारी बँकांमधील अर्थव्यवस्थाच स्वत:च्या ताब्यात यावी, असा केंद्राचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये वकिलांमर्फत कायदेशीर सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे न्यायालयात कशा पद्धतीने जाता येईल. याबाबत राज्य सरकारची सल्लामसलत सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
तुम्ही जरा माझ्या गतीने काम करा
या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध विकास कामांची तसेच प्रकल्पांची माहिती दिली. या दरम्यान मेडद येथे नव्याने बाजार समितीच्या पेट्रोल पंप होत आहे. हा पेट्रोल पंप खरेदी विक्री संघाकडे चालवण्यासाठी देण्यात आला आहे. या पेट्रोल पंपाच्या कामाचे काय झाले, काम कुठपर्यंत आले आहे, अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमा दरम्यान केली. यावेळी एका अधिकाºयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून परवाणगी राहिल्याचे सांगण्यात आले. यावर अजित पवार यांनी सबंधीत अधिकाºयाला धारेवर धरले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या जवळ बसतात. काहिही कारणं सांगता का? त्यांना भेटा, त्यांना अडचणी सांगा, तुम्ही ना काहीजण माझ्या गतीने काम करा, असा सल्ला देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी सबंधीत अधिकाऱ्यांना दिला.
जी मागणी केली तेच निवडणुक चिन्ह मिळेल
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. हाच मुद्दा पडकून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या विचाराचे पॅनेल निवडुण आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा. अवघे सात दिवस प्रचारासाठी मिळाले आहेत. सोमेश्वरचा ३ हजार ३०० रूपयांचा दर हा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यामध्ये आहे. यापुढे कारखान्याची विस्तारवाढ करायची आहे. त्यामुळे आपल्या विचाराचे पॅनेल निवडूण येणे गरजेचे आहे. दरम्यान, आपल्याला निवडणुक चिन्ह काय मिळाले आहे. याची विचारणा पवार यांनी केली, असता अजून चिन्ह मिळायचे आहे. असे उत्तर एका पदाधिकाºयाने दिले. आपली जी पहिली मागणी आहे तेच मिळेल. आणि आता आपणच तेथे आहोत म्हणल्यावर जी मागणी केली आहे तेच चिन्ह मिळेल, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी कार्यक्रमा दरम्यान केली. यावर देखील कार्यक्रमस्थळी खसखस पिकली.