"आजोबा म्हणायचे, चल अजित तमाशाला..."; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकच हास्यकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:18 PM2022-04-18T15:18:34+5:302022-04-18T15:20:37+5:30

कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. १७) पवार बोलत होते

ajit pawar said grandpa used to say lets go to tamasha ajit laugh after statement | "आजोबा म्हणायचे, चल अजित तमाशाला..."; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकच हास्यकल्लोळ

"आजोबा म्हणायचे, चल अजित तमाशाला..."; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर एकच हास्यकल्लोळ

googlenewsNext

बारामती: पाऊस चांगला होणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. गावोगावच्या यात्रा-जत्रा सध्या सुरू आहेत. बारामतीमध्ये सुद्धा उरूस होत आहेत. यानिमित्ताने कुस्त्यांचे फड पार पडत आहेत. कुस्त्यांच्या बरोबर तमाशे असतात. यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी येथे तमाशा असतो का? असा सवाल उपस्थितांना केला. ‘हो आहे’ असे उत्तर मिळताच ‘कधी तरी बोलवा तमाशाला’ असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. त्यावर पवार यांनीदेखील ‘आजोबा म्हणायचे, चल अजित तमाशाला, मात्र कधी तेव्हा जाता आलं नाही.’ यावर कोऱ्हाळे ग्रामस्थांनी ६ तारखेला आहे तमाशा असे उत्तर दिले. त्यावर पवार यांनी ‘ठीक आहे. मी बघितला काय आणि तुम्ही बघितला काय सारखंच आहे, जाऊ द्या’ असे उत्तर दिले. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. १७) पवार बोलत होते.

धर्म, जातीमध्ये तेड करणाऱ्याच्या नादाला लागू नका

सध्या राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मांमध्ये जातीजातींमध्ये तेड निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका. जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबाला बसतो. दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चूल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.

बारामतीमध्ये टायगर व लायन सफारी...

बारामती तालुक्यातील गाडीखेल परिसरामध्ये बिबट्या सफारीबाबत चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा मागे पडल्यानंतर त्याच परिसरात टायगर व लायन सफारी करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील कार्यक्रमांमध्ये व्यक्त केला. येथील जागा निश्चित झाली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे बारामती येथे मयूरेश्वर अभयारण्य, चिंकारा पार्क, शिवसृष्टी याबरोबरच टायगर वन लायन सफारीमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे.

विजेसाठी करावा लागणार रिचार्ज-

मोबाईल रिचार्ज प्रणालीप्रमाणे विजेसाठीसुद्धा प्रीपेड कार्ड पद्धत सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. जेवढ्या पैशांचा रिचार्ज केला जाईल, तेवढीच वीज संबंधितांना वापरता येईल. तुम्हाला चांगल्या प्रकारची सेवा हवी असेल तर आपल्याला नवीन टेक्नाॅलॉजी वापरावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी (दि. १७) ते बोलत होते.

पवार पुढे म्हणाले, जो वीज बिल नियमितपणे भरतो, त्याला फटका बसणार नाही. जे वीज बिल भरत नाहीत, त्यांचा भार वीज बिल भरणाऱ्यांवर बसतो. अलीकडे विजेची चणचण भासायला लागली आहे. देशात व राज्यात देखील कोळशाची कमतरता आहे. त्यासाठी आम्ही परदेशातून कोळसा आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आपल्या पॉवर प्लांटमध्ये १०० टक्के परदेशी कोळसा चालत नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विजेची मागणी ३ ते ४ हजार मेगावॅटने वाढली आहे. बाहेरच्या राज्यांकडून देखील वीज खरेदीचा निर्णय झाला आहे. कोयना प्रकल्पातून विजेसाठी पाणी देण्याबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मदत केली आहे. शेतकऱ्यांसाठी पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाण्याचे नियोजन वीजनिर्मितीसाठी केले आहे. भर दुपारी अनेक ठिकाणी वीज सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. आता जिल्हा परिषदेकडून मिळणारे हायमास्ट दिवे आम्ही बंद केले आहेत. मात्र, हे हायमास्ट दिवे वेळेत बंद होत नाहीत. त्याचा मोठा फटका राज्याला बसत आहे, असेही यावेळी पवार म्हणाले.

Web Title: ajit pawar said grandpa used to say lets go to tamasha ajit laugh after statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.