बारामती : शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात (government medical college) वरिष्ठांना विश्वासात घेऊन काही सुधारणा करा. मी पाहणी करताना काही बारिक - सारिक चुका राहिल्या आहेत. त्या सुधारा. मला काय मी रात्री-अपरात्री किंवा पहाटे पाचलाच येऊन पाहत बसेल, मला सवय आहे. त्यावेळी रात्रीचे डॉक्टर जागे असले पाहिजेत, नर्सेस जाग्या असल्या पाहिजेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या प्रशासनाची व डॉक्टरांची फिरकी घेतली.
बारामती येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयामध्ये बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, मास्क वापरालाच पाहिजे. मी फक्त पाणी पिताना, जेवन करतानाच मास्क काढतो. माझं अनुकरण तुम्ही करावे यासाठी मी मास्क सातत्याने वापरत आहे. तिसरी लाट आली की आम्हाला नकोनको होते. मी हे पोटतिडकीने ऐवढ्यासाठी सांगत आहे की, कोरोना (corona) वाढला की आम्हीला विकास कामांचा सगळा निधी कोरोना उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागतो. शेवटी माणसाचा जीव वाचवणे हे प्रथम कर्तव्य आहे. आता लसीकरण मोठ्याप्रमाणात करण्यात येत आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सलग ७५ तास लसीकरण करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी करण्यात आले. झोपडपट्टी भागात घरोघरी जाऊन लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. काल पुणे येथील कोरोना आढावा बैठकीमध्ये देखील (house to house) लसीकरणाचा सर्व्हे तसेच लसीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.
बाप्पा लक्ष माझ्यावर नाही तर लोकांवर ठेव
आता मंदिरे उघडली आहेत. मी सुद्धा सिद्धिविनायकाचे पहाटे दर्शन घेतले. बाप्पा लक्ष ठेव असे साकडे घातले. लक्ष माझ्यावर नाही तर लोकांवर ठेव. कोरोनाची तिसरी लाट येऊन देऊ नको. असे म्हणालो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कोटीवर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. मागील चार दिवसांपासून उपमुख्यमंत्री पवार यांच्या निकटवर्तीयांशी सबंधीत कंपन्यावर बारामती, दौंड, काटेवाडी आदी ठिकाणी आयकर विभागाचे छापे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर तर पवार यांनी हे वत्कव्य केले नसेल ना अशी चर्चा कार्यक्रम झाल्यानंतर रंगली होती.