पुणे : जयंत पाटील सातत्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असं सांगत आहेत. त्यावर विचारले असता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मला राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटतं नाही. माझी जयंत पाटलांसोबत उद्या भेट होणार आहे. त्यावेळी त्यांना मी विचारेल की, त्यांना याबद्दल कुठू माहिती मिळाली. अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी गिरीश बापट यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर दंगलीवर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, त्यावेळी मी नाशिक दौऱ्यावर होतो. मी काल आव्हान केलं आहे की, दंगल कोणी घडवून आणण्याच्या प्रयत्न करत असेल तर असं होऊ नये. जरी मी विरोधी पक्षात असलो तरी कुठल्याही प्रकारचे असे वक्तव्य होऊ देणार नाही की ज्यामुळे वातावरण बिघडेल. सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करायला हवी. कृपया कुणी माथी भडकून देण्याचे काम केलं तर त्याला कोणीही बळी पडू नका, असं आवाहनही अजित पवार यांनी केले.
छत्रपती संभाजीनगरची सभा होणार-
सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. त्यावर पवार म्हणाले, एकटा अजित पवार या बाबत निर्णय घेत नाही इतर नेते देखील निर्णय करणार आहेत. मी काही बोललो तर ब्रेकिंग न्युज तयार होईल कारण तिथे सगळे नेते तयारी करत आहेत. ठरलेले कार्यक्रम होयलां पाहिजे असं मला वाटतं, असंही पवार म्हणाले.
कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही
शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर खळबळजनक आरोप केले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडा, असं सांगण्यासाठी खुद्द अजित पवार हे अनेकांना फोन करत होते असा आरोप म्हस्के यांनी केला आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी एमसीएची निवडणूक झाली होती. त्यात रोहित पवार अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्या निवडणुकीवरून म्हस्के यांनी अजित पवारांवर आरोप केले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्यांना. असल्या फालतू स्टेटमेंट करणाऱ्यांना मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. जी माझी भूमिका असते तीच भूमिका माझी कायम असते. रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहे. तो माझा पुतण्या आहे तो मला माझ्या मुलासारखा आहे.