अजित पवार म्हणाले, "आता मी ड्रायव्हर होतो अन् साहेबांना कंडक्टर करतो..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:21 PM2022-05-14T14:21:36+5:302022-05-14T14:31:18+5:30
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे कान पिळले....
बारामती : 'जांभळाच्या झाडाखाली बसायचं आ करून अन् जांभूळ थोबाडातच गेलं पाहिजे. खाली पडलं तर ते उचलून टाका, इतका आळशीपणा करायचा नाही. आम्ही सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. तेंव्हा तर तुम्ही झोपला होता. सुविधा मिळाल्या पाहिजेत मात्र सगळं एकदम होत नाही. खुप सुविधा मिळाल्या तर त्याची किंमत राहत नाही. इंदापूर, पुरंदर, दौंडची, फलटणची परिस्थिती पहा, आपली परिस्थिती पहा', अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे व ग्रामस्थांचे कान पिळले.
जळगाव सुपे (ता. बारामती) येथे पवार बोत होते. ते पुढे म्हणाले, चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. का-हाटी येथे कृषी मुल शिक्षण संस्था आहे. तसेच सुपे येथे विद्या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सुविधा देण्यात येणार आहे, असे सांगताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जळगाव सुपे पासून का-हाटी अंतर किती आहे, असा प्रश्न केला. यावर उपस्थितांनी ६ ते ७ किमी अंतर आहे, असे सांगितले.
हा आढावा घेत असतानाच एकाने ‘येथे बस गाड्यांची सोय करावी’ अशी मागणी केली. त्यावर पवार यांनी ‘व्हय बाबा, आता मी ड्रायव्हर होतो. साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रिया तिकीटं फाडेल’ असे म्हणताच उपस्थिांमध्ये खसखस पिकली. त्यावर पवार पुढे म्हणाले, पूर्वी येथील परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये मोठा बदल झाला आहे. परिस्थिती एकदम बदलत नसते. सध्या बस सोय नसेल तर तुमच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी मिळून गाडीची सोय करा. साहेबांना काटेवाडीहून पुण्याला बसने डबा जायचा, चार तासांनी तो डबा पोहचायचा, चटणी भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले. आपण सुद्धा थोडं सहन केलं पाहिजे.
पवार पुढे म्हणाले, चार किलोमिटरसाठी गाडीची सोय सोय करा, उद्या म्हणाल पेपर पण तुम्हीच लिहून द्या, आम्ही फक्त तेथे येतो. काळानुरूप बदल होत जातात. १९७२ साली पवार साहेबांनी या पाझर तलाचे भूमिपुजन केले होते. ५० वर्षांनंतरही आपण त्यातील गाळ काढून त्यामध्ये पाणी कसे येईल यासाठी प्रयत्न करतो आहे, अनेक अडचणी येत असतात. काही असुविधा झाल्या तर थोडं सहन केले पाहिजे, असेही यावेळी पवार म्हणाले.