पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या पुण्यातील कसबा व पिंपरीतील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून महाविकास आघाडी ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तसे सुतोवाच केले असून या मतदारसंघात ज्याची ताकद जास्त त्या पक्षाला इतरांनी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षक सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पोटनिवडणुकीबाबत सोमवारी किंवा मंगळवारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याचे सांगून पवार म्हणाले, “घटक पक्ष तसेच मित्र पक्षांना याबाबत विश्वासात घेतले जाईल. मात्र, पिंपरीमधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली आहे. तसेच ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहे. ही निवडणूक आपण लढवावी अशी त्यांची मागणी आहे. मी अजून पक्षातील सहकाऱ्यांशी बोललेलो नाही. मात्र, याबाबत माझे स्पष्ट मत असून महाविकास आघाडीने या दोन्ही जागा लढवाव्यात.”
"मोठेपणा दाखवून पाठिंबा द्यावा..."
मात्र, राष्ट्रवादी येथून लढणार का असे विचारले असता पवार यांनी हे आताच सांगणे कठीण असून ज्या ठिकाणी ज्याची ताकद थोडीशी जास्त आहे, तिथे त्या पक्षाला इतर पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवून पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली. ही निवडणूक बिनविरोध होईल याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. ते म्हणाले, “चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी व बंधू शंकर जगताप यांनी तसेच कसब्यात दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी केल्याचे कळते. तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात नाक खुपसण्याचे कारण नाही. मात्र, सध्या होत असलेल्या घडामोडींवरून या मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवडणूक होईल याबाबत मी साशंक आहे.”
कोण देणार उमेदवार?
कसबा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे तीन नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक आहेत. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अरविंद शिंदे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार देणार का याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.