अजित पवार म्हणाले की, किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 07:38 PM2019-12-14T19:38:34+5:302019-12-14T19:46:46+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी किमान तीन मंत्रीपदं पुणे जिल्ह्याला मिळावीत अशी मागणी केली आहे. इतकेच नव्हे तर याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशीही बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमानंतर बोलताना पवार यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरही मत मांडले. ते म्हणाले की, 'पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक ताकद दिली आहे. त्यामुळे मंत्रीपदाच्या किमान तीन जागा जिल्ह्याला मिळायला हव्यात असे मी शरद पवार यांना सांगितले आहे.आत्ता झालेले खातेवाटप हा तात्पुरता विस्तार आहे. अधिवेशनात उत्तर देण्यासाठी झालेला हा विस्तार आहे. या महिन्याच्या अखेरीस तीनही पक्ष मिळून मुख्य विस्तार करतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
तुम्हीच पालकमंत्री व्हा या पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला उत्तर देताना त्यांनी जिथं राष्ट्रवादीची ताकद आहे, तिथलं पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळेल. डिसेंबरच्या शेवटच्या याचा निर्णय होईल. जो कोणी पालकमंत्री होईल त्याला विश्वासात घेऊन काम करू याचा अर्थ समजून घ्या की असेही सांगायला ते विसरले नाहीत.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- मंत्रीमंडळातील सहभागाबद्दल तीनही पक्षांचे वरिष्ठ निर्णय घेतील.
- कालपर्यत जे तिकडे होते, ते आज बुके घेऊन इकडे आले, तुम्ही लगेच पाघळता
- पंकजा मुंडे आणि भाजप हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न त्यात नाक खूपसण्याची गरज नाही.
- महाविकासआघाडीचे सरकार आले म्हणून अतिउत्साह दाखवून उतू नका, मातू नका, जमिनीवर पाय ठेवून काम करा.