अजित पवार म्हणाले, "आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 01:07 PM2022-05-28T13:07:59+5:302022-05-28T13:46:40+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वास...
पुणे : गॅप ॲनालिसीस योजनेच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खरेदी केलेल्या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
विधान भवन येथे या उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार उपस्थित होते.
पवार म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.
कोरोना संकटामुळे आरोग्यसेवेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचे महत्त्व देशाला लक्षात आले. त्यादृष्टीचे उत्तम दर्जाची उपकरणे प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुणे जिल्हा परिषदेने आरोग्य सेवेसाठी खरेदी केलेल्या अद्ययावत उपकरणांची माहिती नागरिकांना व्हावी आणि नागरिकांमध्ये आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने आयोजित केलेले हे प्रदर्शन आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या ॲपचे उद्घाटन
पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेने तयार केलेल्या १० लाख रुपयांच्या आतील कामापैकी सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर संघांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे आणि सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेच्या कामाची माहिती करून देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘माझी जिल्हा परिषद-माझे अधिकार’ या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशिक्षण केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या ‘ग्रामपंचायत प्रशिक्षण’ आणि ‘विभागीय चौकशी मॅन्युअल’ या पुस्तिकांचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.