बारामती (पुणे) : पुण्यात माध्यमांशी बोलताना पवार माझ्याकडून सावित्रीबाई फुलें ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला. बोलण्याच्या ओघात ते घडले. माझ्याकडून बोलताना चूक व्हायला नको होती. परंतु ओघात ती झाली. त्याचे मोठे भांडवल करण्यात आले. बोलण्याच्या ओघात झालेली चूक मला लक्षात आल्यावर मी लागलीच ती दुरुस्त करत दिलगिरी व्यक्त केली. आपल्या मराठी संस्कृतीत वडीलधाऱ्यांनी आपल्याला जेथे चूक होते, तेथे दिलगिरी व्यक्त करून पुढे जायची शिकवण दिली आहे, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले.
शुक्रवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना पवार यांच्याकडून सावित्रीबाई फुलें ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला. या पार्श्वभूमीवर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्टीकरण दिले. बारामतीत जनता दरबारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, पुण्यात माध्यमांशी बोलताना पवार माझ्याकडून सावित्रीबाई फुलें ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला. बोलण्याच्या ओघात ते घडले. परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्याचा नको तेवढा गवगवा केला. मी त्यात असा काय गुन्हा केला? असे काय आकाश-पाताळ एक केले? दिवसभर तेच दाखविण्यात आले, असा सवाल विरोधी पक्षनेते पवार यांनी यावेळी केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत काही भगिनींना तर अतिशय तरुण वयात चांगल्या पदावर कामाची संधी मिळाली. त्यांचे मी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. नवीन सरपंच, सदस्यांची एक दिवसीय कार्यशाळा बारामतीत आयोजित करणार आहे. त्यात त्यांची कामे, कामासाठी कोणाकडे पाठपुरावा करावा आदींबाबतचे मार्गदर्शन करणार आहे. नवीन कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. नवीन लोकांच्या हातात गावचा कारभार गेला पाहिजे. बारामती तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे चांगले निकाल लागले. तालुक्यात दोन्ही गट आमच्याच विचारांचे असतात. परंतु गटातटात आम्ही पडत नाही. जो गट निवडून येईल, त्यांना मदत करायची गावच्या विकासाला हातभार लावायचा, ही ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवण मी पुढे घेऊन जात असल्याचे पवार म्हणाले.