अजित पवार, संजय राऊत, हसन मुश्रीफ सगळे घोटाळेबाज; किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:57 PM2022-04-01T18:57:09+5:302022-04-01T18:57:16+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलू नका, कारवाई करा
पुणे : एकेक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील नावे आहेत. हे घोटाळे सिद्ध होत आहेत व तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यांनी आता बोलणे बंद करून कारवाई करायला हवीआणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त बोलत आहेत, त्यांनी आता बोलणे बंद करावे व कारवाई करायला सुरूवात करावी अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.
सॅलीसबरी पार्कजवळच्या आयकर सदनमध्ये शुक्रवारी दुपारी खासदार सोमय्या आले होते. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आयकर विभागाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी आलो असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. सोमय्या म्हणाले, मुश्रीफ यांनी कोट्यवधी रूपयांची माया जमा केली. त्याबाबत मी तक्रार केली आहे. खासदार संजय राऊत यांनी नुकतेच सक्त वसूली संचलनालयात ५५ लाख रूपये जमा केले. जनतेचा पैसा जनतेच्या तिजोरीत गेला. घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या सर्वांनाच हे करावे लागणार आहे.
कारखाना पवार यांचा कधी नव्हताच
जरंडेश्वर कारखान्याबाबत न्यायालयाने आता निकाल दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्यांच्या सभासदांमध्ये भ्रम पसरवत आहेत. कारवाई झाली तर कारखाना बंद पडणार नाही, तो सुरूच राहणार आहे. हा कारखाना पवार यांचा कधी नव्हताच. तो त्यांनी गैरपणे विकत घेतला. गुरू कमोडीटी ही कंपनी त्यांच्याच माणसांची आहे. याही तक्रारीचा आम्ही कायम पाठपुरावा करणार आहोत.
सोमय्या यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना लगेचच तिथून काढून लावले. सोमय्या म्हणाले की पोलिसांनी पवार यांच्या माणसांना मला भेटू द्यायला हवे होते. घोटाळा कसा झाला हे मी त्यांना सांगितले असते. शिवसेनेने मागील वेळी सोमय्या यांनी महापालिकेच्या आवारात धक्काबुक्की केली होती. ते लक्षात ठेवून भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी सोमय्या यांच्याभोवती कडे केले होते. माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, संदीप खर्डेकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.