- राजू इनामदार
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका पुतण्याच्या वादात पक्षाचे लोकप्रतिनिधी आपापला विठ्ठल निवडत आहेत. पक्ष संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच पंचाईत होत असल्याचे चित्र आहे. आपण कोणत्या विठ्ठलाला धरायचे की आपला वेगळा विठ्ठल तयार करायचा? या संभ्रमात कार्यकर्ते दिसत आहेत.
राजकीय दुफळीमध्ये नेते मंडळी भावनिक स्तरावर शरद पवार यांच्याबरोबर, तर व्यावहारिक पातळीवर अजित पवार यांच्याकडे, अशी सर्वसाधारण विभागणी झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या घडामोडींमधून पुणे शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला ग्रहण लागल्याचे वास्तव ठळकपणे पुढे येत आहे.
जिल्हा कोणत्या पवारांचा?
- एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुणे जिल्ह्यात खुद्द शरद पवार, सुप्रिया सुळे, पुण्याच्या माजी महापौर असलेल्या ॲड. वंदना चव्हाण, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) असे ४ खासदार आहेत. यातील शरद पवार व चव्हाण हे राज्यसभेचे; तर सुळे (बारामती) व डॉ. कोल्हे (शिरूर) मतदारांमधून निवडून आलेले खासदार आहेत.
- जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे १० आमदार आहेत. त्यातही बारामतीमधून खुद्द अजित पवार यांचा समावेश आहे. त्याशिवाय दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), अतुल बेनके (जुन्नर), अशोक पवार (शिरूर), दत्ता भरणे (इंदापूर), दिलीप मोहिते (खेड-आळंदी) सचिन शेळके (मावळ), अण्णा बनसोडे (पिंपरी), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), चेतन तुपे (हडपसर) हे आमदार आहेत. राजकीय पक्षासाठी एका जिल्ह्यातील हे राजकीय वर्चस्व चांगले असले तरी जिल्ह्यात खुद्द दोन्ही पवार असल्याने ते तसे कमीच असल्याचे जाणकार राजकीय अभ्यासकांचे मत आहे.
फाटाफुटीचा फटका
आता शरद पवार व अजित पवार वेगवेगळे झाले आहेत. त्याबरोबर पक्षाच्या लोकप्रतिनिधींमध्ये फाटाफूट झाली आहे. तळ्यात मळ्यात करणारे अजूनही काही आहेत, मात्र काहींनी उघडपणे दोन्हीपैकी एक बाजूत प्रवेश केला आहे. खासदारांमध्ये सुळे अर्थातच शरद पवारांबरोबर आहेत, त्याशिवाय डॉ. कोल्हे व ॲड. चव्हाण हेही शरद पवार यांच्याकडेच आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या १० आमदारांपैकी दिलीप वळसे यांनी मंत्रिपदाची शपथच घेतली आहे. त्याशिवाय दत्ता भरणे, सुनील शेळके, सुनील टिंगरे यांनी अजित पवार यांची साथ धरली आहे; तर चेतन तुपे, अशोक पवार हे शरद पवार यांच्याबरोबर दिसत आहेत. अतुल बेनके, अण्णा बनसोडे अजून तरी तटस्थ दिसत आहेत.
भावनिक आणि व्यावहारिक स्तरावर विभागणी
पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका या दोन्हीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. तिथेही नगरसेवकांमध्ये फाटाफूट झालेली दिसते आहे. ही साथ भावनिक व व्यावहारिक स्तरावर असल्याचे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे. विविध पदांवर काम केलेल्यांचा ओढा अजित पवार यांच्याकडे आहे. याचे कारण या पदांवर त्यांची नियुक्ती अजित पवार यांनीच केलेली आहे. अजित पवारांकडे गेलेले बहुसंख्य नगरसेवक विविध पदांवर काम केलेले असल्याने त्याला पुष्टी मिळत आहे. राजकीय सुरुवातच शरद पवार यांच्या प्रेरणेने केलेले काही नगरसेवक मात्र त्यांच्याकडे झुकले आहेत. पुण्यात उपनगरांमधील बहुसंख्य नगरसेवक अजित पवार यांच्याकडे दिसत आहेत.
अन्य राजकीय पक्षांना हाेणार फायदा :
पवार कुटुंबातील फुटीमुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वर्चस्वाला ग्रहण लागलेले दिसत आहे. यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अडचण झाली आहे. कोणाच्या बरोबर जायचे याचा निर्णय त्यांच्याकडून होत नाही. कुठेही गेले तरी पक्षाचे दोन गट यापुढे जिल्ह्यात असणार आहे हे नक्कीच झाले आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत मतविभागणी होऊन त्याचा फायदा अन्य राजकीय पक्षांना मिळेल, अशी शक्यता राजकीय क्षेत्रातील काही जाणकारांनी बोलून दाखवली.