पुणे: जिल्हा बँक दूध संघ तसेच बाजार समिती आणि सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्याबरोबर असल्याचा दावा करत जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच मिळावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने गुरुवारी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील आमचे बलाबल लक्षात घेता अजित पवार यांना पालकमंत्री करावे, अशी आमची मागणी आहे. आजच्या बैठकीला पुरंदर, मुळशी आणि दौंड तालुक्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित नव्हते. जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना आज नेमणूक पत्र देण्यात आली.
अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो काढण्यात आला. फोटोबद्दल शरद पवार यांनीच हरकत घेतल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचनेमुळे त्यांचा फोटो लावला नसल्याचे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. सध्या आमच्या पक्षाचे कार्यालय गाडीमध्येच असून, लवकरच नवे कार्यालय सुरू केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हाभर बूथ सर्वेक्षण अभियान राबविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तातडीने भरून देण्याविषयी निर्णय झाला आहे. तसेच, जिल्ह्यातील काही तालुक्यातील आमदार अजूनही संदिग्ध आहेत, अशा तालुक्यात पक्ष संघटनेमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही गारटकर यांनी सांगितले. यावेळी वैशाली नागवडे, हनुमंत कोकाटे, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.