Ajit Pawar: अजित पवारांनी विधानसभा लढवावी; बारामती तालुक्यातून तब्बल १ लाख निनावी पत्राद्वारे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 01:40 PM2024-09-15T13:40:40+5:302024-09-15T13:41:01+5:30
बारामतीचा विकास पुढे न्यायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तेच येथील उमेदवार असतील, मतदारांचा आग्रह
बारामती : बारामती विधानसभेच्या निवडणुकीबाबत वेगळा विचार करणारे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच बारामतीत केले होते. त्यानंतर बारामतीत कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री पवार यांनीच ही निवडणूक लढविण्याचा आग्रह केला आहे. त्यासाठी पवार यांच्या वक्तव्यानंतर तालुक्यातून एक लाख ११ हजार ७०७ विनंती पत्रे आली असून, अजितदादांनीच निवडणूक लढवावी, अशी सर्वांची मागणी आहे. याबाबत ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी माहिती दिली.
गुजर यांच्याकडे पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील बूथ कमिटीच्या पुनर्रचनेची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार गुजर यांनी तालुक्यातील ११७ गावांचा दौरा केला. शहरातील १९ प्रभागांत जात बूथ समित्यांचे पुनर्गठन केले. ३८६ बूथ कमिटीअंतर्गत ११ हजार ७६० बूथ कमिटी मेंबर झाले आहेत. या दौऱ्यात पवार हेच उमेदवार असावेत, अशी आग्रही मागणी जनतेने केल्याचे गुजर यांनी सांगितले. यासाठी एक लाखाहून अधिक विनंती पत्रे मतदारांनी दिली आहेत. निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय अजित पवार एकटे घेऊ शकत नाहीत. गेली ३५ वर्षे बारामतीकरांवर त्यांनी प्रेम केले. तितकेच प्रेम विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर केले आहे. बारामतीचा विकास पुढे न्यायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तेच येथील उमेदवार असतील. मतदारांच्या आग्रहाखातर ते निवडणूक लढवतील, असे गुजर यांनी स्पष्ट केले.