पुणे : महापालिकेने जाहीर केलेल्या नियमावलीत पुण्यात सायंकाळी सहापर्यंतच दुकाने उघडी राहणार असल्याचे म्हटले आहे. राज्यात सर्वत्र जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत असताना पुण्यात सहा वाजेपर्यंतच का केली? असा सवाल कला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीत राज्याप्रमाणेच पुण्यातही नियम असतील, असे म्हटले होते. त्यांनी आपला शब्द फिरवल्याची टीका होत आहे.
खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधामध्ये राज्यात ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी आहे. मात्र, पुणे शहरात मात्र ही मर्यादा सायंकाळी ६ वाजेपर्यंत केली गेली आहे़ हा निर्णय अयोग्य असून, राज्याप्रमाणेच पुण्यातही रात्री आठपर्यंतची मर्यादा असावी़
कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी संपूर्ण राज्यात एकच निर्णय लागू राहिल, असे सांगितले होते़ मात्र तसे न होता पुण्याला पूर्वीप्रमाणेच निर्बंध लावण्यात आले आहेत़ सायंकाळी सहा वाजता आस्थापना, कंपन्या बंद झाल्यावर तेथील कामगारांना घरी जाण्यासाठी तास दीड तास तरी वेळ लागतो. त्यातच पुण्यातील बससेवाही बंद आहे़ त्यामुळे या निर्णयाबाबत पुनर्विचार होणे आवश्यक असल्याचेही खासदार बापट यांनी सांगितले.
राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर करतानाच, स्थानिक प्रशासनाने त्या त्या ठिकाणची परिस्थितीनुसार त्यात बदल करावा असेही स्पष्ट केलेले आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची वाढ ही इतर शहरांच्या तुलनेत अधिक असल्याने, पुणे महापालिकेने यापूर्वीच शहरातील दुकाने सायंकाळी सहा वाजता बंद करून संचारबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेली नियमावली योग्य असल्याचे मत शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी व्यक्त केले.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुण्याची नियमावली राज्याची नियमावली लागू होण्यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून, ती अंमलबात आणली जात आहे़ निर्बंध पाळणे हे महत्त्वाचे असून सायंकाळी सहा की रात्री आठ हा विषय महत्त्वाचा नाही.कोरोना रूग्णसंख्या वाढत असून, आज रूग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आपण कोरोना संसर्ग रोखणे हे जरूरी आहे, असे मत काँग्रेस महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केले.