एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:49 IST2025-03-01T11:48:38+5:302025-03-01T11:49:14+5:30
एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले

एकनाथ शिंदेंच्या 'पुणे जिल्हा भगवा करू' वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच बोलले..
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी राज्यातील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी सरकारकडून विशेष मोहिम राबवली जात असल्याचे सांगितले. बालकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
तसेच, पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करत असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, उद्याच्या (३ मार्च) तारखेला पुरवणी मागण्या मान्य करण्यात येणार आहेत. आम्ही अर्थसंकल्प सादर करणार असून, सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू."
यावेळी त्यांनी पक्ष वाढीबाबत भूमिका स्पष्ट केली. एकनाथ शिंदे यांच्या पुणे जिल्हा भगवा करू या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, तुम्ही कितीही प्रश्न विचारा, आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पुणे जिल्हा भगवा करण्याची इच्छा शिंदे गटाला आहे, तसेच प्रत्येक पक्ष आपल्या जिल्ह्यासाठी वेगवेगळे दावे करू शकतो. कालवा समिती बैठक आणि गृहमंत्री वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना अजित पवार पुढे म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन केले जाते. यात काही विशेष निर्णय नाही, हे नियोजनाचेच काम आहे.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, 'मी कोणत्याही विशिष्ट प्रकरणावर बोलत नाही. परंतु, तक्रारी आल्यास पोलीस तत्काळ कारवाई करतात. माध्यमं काहीवेळा घाई करतात, परंतु कायदा सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.'
वसंत मोरे यांच्याशी संबंधित तोडफोड या प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले, "सत्यता पुढे येऊ द्या. आरोपी सापडत नसेल म्हणून तोडफोड करणे योग्य नाही. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडून नुकसान वसूल करावे, असे कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे."
तानाजी सावंत यांचे टेंडर रद्द
तानाजी सावंत यांचे टेंडर रद्द केल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले,माध्यमांतून मी ही माहिती घेतली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल.
पीएमपीएल डेपो मॅनेजरविरोधात तक्रारी
पीएमपीएलमध्ये डेपो मॅनेजर महिलांना आणि ड्रायव्हरांना त्रास देत असल्याच्या तक्रारीबाबत अजित पवार म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेतली असून, दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.