मुख्यमंत्री महोदय, मागच्यांच्या नावाने पावती का फाडता : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 08:53 PM2018-05-31T20:53:39+5:302018-05-31T20:53:39+5:30
भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही मुख्यमंत्री महोदय मागच्या सरकारच्या नावाने पावत्या का फाडत आहे असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
पुणे : भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही मुख्यमंत्री महोदय मागच्या सरकारच्या नावाने पावत्या का फाडत आहे असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपयशाचे खापर मागील सरकारवर फोडले जाते यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा समाचार घेतला.सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाल्यावर त्यांनी राज्याच्या प्रश्नासाठी मागच्या सरकारच्या नावाने पावती फाडू नये अशा शब्दात ठणकावले. एक वर्ष ठीक होते पण आता त्यांनी कर्तृत्व दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे शिकवणी लावावी या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या बहिणीने ते माझ्या प्रेमाखातर ते विधान सोशल मीडियावर टाकलं असलं तरी मुख्यमंत्री उच्चशिक्षित आहेत. त्यांच्या आणि माझ्या पक्षाची ध्येयधोरण वेगळी आहेत, असं कोणी कोणाकडे शिकवणीला जात नसतात असेही ते म्हणाले.
निरंजन डावखरे यांना भाजपमध्ये जाण्याआधी मी ''तुझ्या वडिलांनाही हे आवडले नसते, शरद पवार यांनी त्यांना २४वर्ष आमदारपद दिले, १८ वर्ष उपसभापतीपद दिले''याची आठवण करून दिली. मात्र काहीजण उगवत्या सूर्याला मदत करतात, काही निष्ठेला महत्व देतात अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्यातील खासदारकीची जागा राष्ट्रवादी लढवणार या पवार यांच्या विधानाने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. त्यावर पवार यांनी असा काही निर्णय झाला असून वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील सांगून पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.