राजू इनामदार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून राज्य सरकारला पाठिंबा जाहीर केलेल्या अजित पवार यांच्या राजकीय कृतीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षालाच बसणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना थेट मंत्रिपदेच दिल्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या आहेत शिवाय पवारांबरोबर संघर्ष करून मिळवलेले वर्चस्व आता राखून ठेवण्याचे नवे आव्हान भाजप कार्यकर्त्यांसमोर उभे राहिले आहे.
संधी हुकल्याची भावना
अजित पवारपुणे जिल्ह्यातीलच आहेत. मागील अनेक वर्षे राज्यातील सत्तेत आहेत. सहकारी संस्थांपासून ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील दोन्ही महापालिकांवर त्यांचेच राजकीय वर्चस्व आहे. त्यांच्याबरोबर सतत राजकीय संघर्ष करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचे अस्तित्व जिल्ह्यातील काही पॉकेट्समध्ये निर्माण केले. आता अजित पवारच सरकारबरोबर, पर्यायाने भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हुरूप येण्याऐवजी संधीची माती झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
मंत्रिपदाच्या इच्छुकांचे काय
पर्वतीच्या ३ वेळा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ तसेच पिंपरी-चिंचवडमधून आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपदाची आशा होती. त्याशिवाय दौंडमधून राहुल कुल हे देखील इच्छुक होते. महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्यांना शांत बसावे लागले. मध्यंतरी शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर भाजपने एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. आतातरी मंत्रिपद मिळेल असे मिसाळ, लांडगे, कुल यांच्या समर्थकांना वाटत होते; मात्र, वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. आता पुन्हा चित्र बदलले आहे.
आशा संपल्यातच जमा
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले, त्याचबरोबर दिलीप वळसे यांनाही मंत्री केले गेले. जिल्ह्याला आता यापेक्षा जास्त मंत्रिपदे मिळणे शक्य नाही. त्यामुळे मिसाळ, लांडगे व कूल यांचे मनातले मंत्रिपद हुकल्यातच जमा आहे.
शहरातील तसेच जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, इंदापूर अशा अनेक तालुक्यांमध्ये भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वत:चे अस्तित्व तयार केले होते. मात्र, इंदापूरमध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांना भाजपने थेट पक्षातच घेतले. आता ज्यांच्याबरोबर राजकीय संघर्ष केला त्या अजित पवार व सहकाऱ्यांचा पाठिंबा घेऊन त्यांना मंत्रिपदेही दिली. त्यामुळे भाजपचे हे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:च्या राजकीय अस्तित्वाच्या चिंतेत आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन यांच्याविरोधात काहीही केले तरी पक्षाचे नेते कसा चाप लावतात याचा अनुभव तेथील स्थानिक कार्यकर्ते घेत आहेत.
शिंदे गटातही नाराजी
शिवसेनेच्या फुटीच्या वेळेस शहर तसेच जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिरूरचे माजी खासदार शिवाजीरावर आढळराव, पुरंदरचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उघडपणे पाठिंबा दिला. शहरातील माजी नगरसेवक नाना भानगिरे त्यांच्याबरोबर गेले. आता शिंदे गटात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. त्यांनाही सत्तेकडून राजकीय आशा होत्या. मात्र, त्या सत्तेत आता अजित पवार वाटेकरी आले. त्यामुळे तेही नाराज असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस मात्र खूश
काँग्रेसच्या गोटात मात्र चांगले वातावरण आहे. त्यांच्या दृष्टीने जिल्ह्यातील पक्षवाढीत सर्वांत मोठा अडथळा राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता. त्यातच फूट पडल्यामुळे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वही कमी झाले. आता शरद पवार असले तरी त्यांना मर्यादा येतील, शिवसेनेची जिल्ह्यात विशेष राजकीय शक्ती नाही, त्यामुळे काँग्रेसकडेच जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेतृत्व येईल, अशी आशा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आहे.
दोन्ही महापालिकांमध्ये अस्वस्थता
पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्येही अस्वस्थता आहे. कारण या दोन्ही महापालिकांवरचे अजित पवारांचे वर्चस्व भाजपने मागील काही वर्षात मोडीत काढले होते. दोन्ही महापालिकांची सत्ता भाजपने निर्विवादपणे मिळविली हाेती. आता राज्यातील सत्तेत, तेही उपमुख्यमंत्रिपदावर अजित पवार विराजमान झाल्याने ते व त्यांचे कार्यकर्तेच वरचष्मा ठेवतील अशी भीती भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्याबरोबर राजकीय संघर्ष करायचे झाले तर पक्षातीलच ज्येेष्ठ नेत्यांची नाराजी पदरी येणार असे त्यांना वाटते.
जिल्हा परिषदेतही चित्र अस्पष्टच
जिल्हा परिषदेतही सर्वसाधारणपणे अशीच स्थिती आहे. अजित पवार यांचे पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचेच जिल्हा परिषदेवर वर्चस्व होते. आता त्यात फूट पडली आहे. तिथेही कोण कोणाकडे? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शरद पवार यांना मानणाऱ्यांची संख्या बरीच असली तरी अजित पवार यांनी कामे देऊन, पदे देऊन अनेकांना मोठे केले आहे. ते अजित पवार यांच्याबरोबर राहतील असे दिसते.