पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने केलेल्या शहरातील रस्त्यांच्या रूंदीकरण ठरावाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी ( दि.१५) त्यांनी यासंदर्भात नगरविकास खात्याच्या सचिवांसोबत पालिका आयुक्त व महापौर यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. यात या ठरावाच्या आवश्यकतेबाबत पालिकेला त्यांची भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. आधी शहरातील ९ मीटरचे ३२३ व नंतर ऊपसुचनेसह ६ मीटरच्या रस्त्यांचेही रूंदीकरण करण्याचा हा ठराव पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला आहे. उपमुख्यमंत्री पवार शुक्रवारी दिवसभर पुण्यात होते. त्यांच्याकडे या ठरावाच्या विरोधात आधीच तक्रारी झाल्या आहेत. तो त्यानंतरही मंजूर झाल्यावर माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ठरावच बेकायदा असल्याची टीका केली. पवार यांच्याकडे त्यांनीच यासंबधीची सर्व माहिती देत यात लक्ष घालावे अशी विनंती केली होती. शुक्रवारच्या पवार यांच्या दौर्यात जगताप यांच्यासह आणखी काही जणांनी पवार यांची भेट घेत या ठरावाबाबत तक्रारी केल्या.त्याची दखल घेत पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. बहुमताच्या जोरावर कोणतेही निर्णय लादू नका अशी जाहीर तंबी देत पवार यांनी दिली होती. आयुक्त शेखर गायकवाड, महापौर मुरलीधर मोहोळ यांना त्यांनी मोजकेच रस्ते का व कशासाठी असा सवालही केला होता. आता पालिकेला या ठरावासंबधीची गरज बैठकीत पटवून द्यावी लागणार आहे.नगरविकास खात्याचे सचिव व अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला ऊपस्थित असतील. त्यांच्याकडून.पवार हा ठराव तपासून घेण्याचीही शक्यता आहे.
पुणे महापालिकेच्या रस्ते रुंदीकरण ठरावाची अजित पवारांकडून गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:28 PM
रस्त्यांचे रूंदीकरण ठराव पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला आहे..
ठळक मुद्देमंगळवारी मुंबईत बैठक: पालिकेला आवश्यकता पटवून द्यावी लागणार