Ashadhi Wari: अजित पवारांनी टाळ हाती घेत केला विठूनामाचा गजर; बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत सपत्नीक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 03:03 PM2024-07-07T15:03:48+5:302024-07-07T15:04:54+5:30
अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला
बारामती:
एक तरी वारी अनुभवावी
मुखी घ्यावे नाम पांडुरंगाचे
पंढरीची वारी म्हणजे एक समृध्द करणारा अध्यात्मिक अनुभव. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या अभंगातून पांडुरंगाची कृपा अनुभवण्याची संधी मिळतेय हे केवढं मोठं साैभाग्य,अशा भक्तीभावाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रथमच बारामती ते काटेवाडी सपत्नीक पायी वारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि ७) सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासमवेत बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला.तसेच टाळ हाती घेत विठुनामाचा गजर केला.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात, टाळ मृदंगाच्या गजरात, हाती दिंड्या-पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झाले. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.
शहरातील मोतीबागेत पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर पवार यांनी सपत्नीक वारीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीने विठूनामाचा गजर केला.यावेळी पवार यांच्यासमवेत सेल्फी काढण्यासाठी, तसेच हस्तांदोलन करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. यावेळी मार्गावर काही काळ उपमुख्यमंत्री पवार यांनी पालखी रथाचे काही काळ सारथय केले.दरम्यान, मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून, फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
तुच माझा विठ्ठल ..तुच माझा पाठीराखा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाला भक्तीभावाने साद घातली.आज वारीत दंग होवुन वारकर्यांसोबत चालताना विठुरायाला राज्यातील जनतेच्या सुख समृध्दीसाठी पवार यांनी साकडे घातले.