पुणे : लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजप शिंदे गट, महाविकास आघाडी दोघांकडून राज्यात सभा घेतल्या जात आहेत. अशातच इतर पक्षांच्याही चर्चासत्र, भेटीगाठी सुरु आहेत. त्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांबाबत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना उल्लू बनवणारा एकमेव नेता अजित पवार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. म्हणूनच काल महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेच्या केंद्रस्थानी अजित पवार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, असं विधान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून ते मुख्यमंत्री पदासाठी इच्छूक असल्याची चर्चा सुरू झाली. तसंच, ठिकठिकाणी त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही पोस्टर लागले होते. तसेच अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. पण स्वतः अजितदादांनी मी कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरूनच आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरवू
मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो होतो. ते निकाली लावण्यासाठी सत्ता हवी आहे. सध्या महाराष्ट्रात आरक्षणाबाबत राजकारण होतंय. आम्ही संघटन तयार केलं आहे. पण एकत्र यायचं की नाही हे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ठरवणार आहोत. तसेच महाराष्ट्रात सुरू असलेले सद्यस्थितीचे राजकारण व राज्यासमोर असलेल्या समस्या, जनतेच्या गरजा - अपेक्षा यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले आहे.