बारामती : कर्जत - जामखेडला काल गेलो होतो. मात्र तिकडे कोणीही मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले. मी रोहितला म्हंटलं, अरे शहाण्या तु आमदार आहेस. तु मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना सुनावले.
धुमाळवाडी (ता. बारामती) येथील एका पंतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, कोरोना गेलेला नाही काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. लसीकरण करून घ्या. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. लसीकरण वाढवण्याकरीता उपक्रम राबवा. लसीकरण झाल्यावर जरी कोरोना झाला तरी माणूस वाचतो.
कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाराला ५० हजारांचं बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. परिणामी नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे बक्षिस देता आले नाही. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल. कोरोनाच्या संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम मिळत नाही.