- प्रकाश गायकर
पिंपरी :भाजपाचेचंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री केल्याने ते नाराज आहेत. आई-वडिलांना शिव्या द्या पण पंतप्रधान मोदी व शहा यांना काही म्हणून नका असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे. त्यांचे असे बोलणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, आपण एखाद्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केल्यामुळे सुसंस्कृतपणा आहे की नाही याची शंका येते. स्वत:च्या आई वडिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ असल्याचा टोला पवार यांनी लगावला.
... तर मग महापालिका निवडणूक का घेत नाही?
तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्य सरकार सद्यस्थितीत महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या मूडमध्ये नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत निवडणुका लांबवायच्या आहेत. अनेक महापालिकांची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतर त्याठिकाणी किती दिवस प्रशासन ठेवायचे यालाही मर्यादा असतात. आता कोरोनाही संपला आहे. तुम्ही मुंबईमध्ये पोटनिवडणुक लावू शकता मात्र, महापालिका निवडणुका घेत नाही यावरून सर्व प्रकार लक्षात येतो. सद्यस्थितीत इच्छुकांचाही खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनी आता खर्चाला थोडा आवर घालावा असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.