सुप्रिया'ताईं'साठी अजित'दादांनी केली हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 03:42 PM2019-03-29T15:42:33+5:302019-03-29T15:51:58+5:30
राजकारणात कधी कोणाची गरज भासेल हे सांगता येत नाही. याच समीकरणानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याकरिता अजित पवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली.
पुणे : राजकारणात कधी कोणाची गरज भासेल हे सांगता येत नाही. याच समीकरणानुसार बारामती लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्याकरिता अजित पवार यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. २०१४साली दुभंगलेली मने मतांसाठी जुळवण्याचा हा पवार यांचा प्रयत्न असून 'तुम मुझे लोकसभा दो, मैं तुम्हे विधानसभा दूंगा' असा मानण्यात येतो आहे.
पुण्यात शुक्रवारी पाटील यांच्या घरी अजित पवार यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांनी हजेरी लावल्याचे बघायला मिळाले. २०१४साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीने पुरंदरमध्ये संजय जगताप आणि इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा केलेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटेदेखील खूप प्रयत्नांनी निवडून आले. हे तीनही मतदारसंघ बारामतीत येत असल्याने राष्ट्रवादीला चांगल्या मताधिक्यासाठी पाटील यांची गरज आहे. दुसरीकडे भाजपने कांचन कुल यांच्या रूपाने सुळे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कुल कमळावर लढणार असल्याने त्यांना खड़कवासल्यातून फायदा होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे बारामती तालुक्यात नातेसंबंध असल्यामुळे तिथेही सुळे यांना मतांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशावेळी पुरंदर, भोर आणि इंदापूरची मते सुळे यांच्याकरीता महत्वाची ठरणार आहे. म्हणून मागील निवडणुकीत दुखावलेल्या पाटील यांची समजूत काढण्यासाठी स्वतः पवार त्यांच्या घरी पोचल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी झालेल्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, 'आघाडी झालेली आहे. आगामी विधानसभा आमदार संग्राम थोपटे यांना भोर, संजय जगताप यांना पुरंदर आणि इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचा गांभीर्याने विचार करावा अशी चर्चा झाली. अजित पवार यांनी मात्र बोलताना, 'जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी, टोकाची भूमिका न घेता कार्यकर्त्यांमध्ये चांगले वातावरण तयार व्हावे याकरिता बैठक आयोजित केल्याचे सांगितले.