पुणे : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पवारांनी काेरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर मुंबईतील इंदु मिलच्या जागेवरील आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाची माहिती घेतली. त्याचबराेबर पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर त्यांनी पुण्याच्या पाण्यासंदर्भात देखील बैठक घेतली. आज त्यांनी पुण्यातील पाेलीस वसाहतींची पाहणी केली.
पुण्यातील पाेलीस वसाहतींची अवस्था गेल्या काही दिवसांपासून बिकट झाली आहे. अनेक वसाहतींमध्ये पाेलिसांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज अजित पवारांंनी शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरु असलेल्या तसेच जुन्या पाेलीस वसाहतीची पाहणी केली. पाेलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच त्या साेडविणयासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त संभाजी कदम, पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते. पवारांनी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, इमारतीची पुनर्बांधणी यासंदर्भातील चर्चेसोबतच सद्यास्थितीत पोलीस वसाहतीचे सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. पोलीस वसाहत परिसरासोबतच पोलीस पाल्य वसतीगृहाचीही पाहणी केली. पोलीस वसाहतीचे अत्यंत उत्कृष्ट काम करून राज्यात आदर्श निर्माण करूया, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.