Ajit Pawar: कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय हे आपण सर्वच पाहात आहोत. त्यामुळे नियम पाळले पाहिजेत हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी प्रतिनिधींशी बोलत होते.
"कोरोना संपल्याच्या अविर्भावात अनेकजण वावरत आहेत. हे काही योग्य नाही. हे थांबायला हवं. काही लोक रस्त्यावर येऊन राजकारण करत आहेत. तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ लोकांनी सरकारवर आणू नये", असंही अजित पवार म्हणाले.
मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुनही टीकास्त्र"काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूनं आहे. केंद्र सरकारनंही सांगितलं आहे की खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत", असा सवाल अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
'ते' आरोप धादांत खोटेराज्य सहकारी बँकेवर ईडीनं छापेमारी केल्याचं वृत्त सोशल मीडियात व्हायरल झालं. मात्र अशी कुठलीही घटना घडलेली नाही. या धादांद खोट्या बातम्या आहेत. मीडियानं विश्वासार्ह बातम्या द्याव्यात, लोकांचा आणि आमचा विश्वास आता उडत चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.
"मी ४० वर्ष राजकारणात असून मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीनं बोलत असतो. शहानिशा न करता बातम्या दिल्या जाता हे दुर्दैवी आहे. काही लोकांमुळे सहकारी खातं बदनाम होतंय", असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.