पुणे - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी नेमणूक केली आहे. या नेमणुकीत काही मंत्र्यांना दोन जिल्ह्याचा तर उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा पदभार देण्यात आला आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी अगोदर टीका केली होती. आता, फडणवीसांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांनी फडणवीसांना ६ जिल्ह्याच्या जबाबदारीवरुन टोला लगावला होता.
लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे. पण काही मंत्र्यांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्यावा लागतो. उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विधानसभा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता. मात्र, पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीसांची आणि शिंदे सरकारची पाठराखण केली आहे.
बऱ्याच जणांना दोन-दोन जिल्हे दिले आहेत, काहींना एकेक दिला आहे. केवळ, उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. आज त्यांच्या सरकारकडे २० मंत्री आहेत, पण, ३६ जिल्ह्यात पालकमंत्री देणे यासंदर्भात विचार करुन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हा त्यांचा अधिकार आहे. इतके दिवस आम्ही मागणी करत होतो पालकमंत्री द्या, पालकमंत्री द्या, त्यांनी दिले. त्यामुळे, आता आपण समाधान मानलं पाहिजे, ५ का दिले, सहाच का दिले, अशा विचारांचा मी नाही, असे अजित पवार म्हणाले. तसेच, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे पालकमंत्री तेवढा वेळ देऊ शकतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. त्यावरही अजित पवारांनी स्पष्टच उत्तर दिले.
तीन महिने जर कुणीच पालकमंत्री नव्हता, तर त्यांना विश्वास वाटला असेल ते ६ जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकतात. किंवा, त्यांचा तिसऱ्यांदा विस्तारवाढ होईल, तोपर्यंत ती तडजोड असेल, असेही पाटील यांनी म्हटले. अजित पवार यांनी एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याचं दिसून आलं. तसेच, पुण्याच्या पालकमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होतील हे विनाकारणच्या बातम्या आहेत. चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे पालकमंत्री होतील असे आम्हाला वाटत होते, असेही अजित पवार यांनी म्हटले.