मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

By हणमंत पाटील | Published: April 22, 2023 06:34 PM2023-04-22T18:34:11+5:302023-04-22T18:42:14+5:30

मुंबईला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला तातडीने गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे...

ajit pawar who said he would like to become CM, suddenly met Sharad Pawar in Mumbai | मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

googlenewsNext

पिंपरी : आगामी २०२४ च्या विधानसभेची वाट कशाला पहायची, आताही मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल, अशी इच्छा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरीतील कार्यक्रमात शुक्रवारी व्यक्त केली. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसभराचे कार्यक्रम अचानक रद्द केले. ते मुंबईला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला तातडीने गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

राज्यात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना २००४ मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री पद घेतले. ही त्यावेळी वरिष्ठांची चूक झाली, अशी कबुली देत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच, मलाही १०० टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडले असते, अशी भावना अजित पवार यांनी ‘लोकमत’ आयोजित ३ फेब्रुवारीच्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केली होती. त्याचा पुनर्रउच्चार अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमातही केला. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना दाद देत अजित पवार आगे बढोच्या घोषणा दिल्या.

राजकीय घडामोडींना वेग...

आताही मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, या पवार यांच्या विधानाने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कालपासून जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून अजित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी फ्लेक्सबाजी सुरू केली. त्यामुळे मुंबईत भेटायला येण्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप अजित पवार यांना मिळाला. त्यामुळे पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणारे नियोजित कार्यक्रम रद्द केले. शरद पवार यांनी मुंबईमध्ये येऊन तातडीने भेटण्याचा निरोप दिल्याने ते साहेबांच्या भेटीला मुंबईला रवाना झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

अजित पवार यांचा खेड येथे शनिवारी कार्यक्रम होता. त्यानंतर त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यावे, अशी आम्ही विनंती केली. ते येणारही होते. मात्र, अचानक त्यांना काम निघाल्याने त्यांनी नियोजित दौरा रद्द करून ते मुंबईला गेले.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी, पिंपरी-चिंचवड.

Web Title: ajit pawar who said he would like to become CM, suddenly met Sharad Pawar in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.