Ajit Pawar: अजित पवारांचा ४० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 10:25 AM2024-11-21T10:25:24+5:302024-11-21T10:29:23+5:30
राज्यात महाविकास आघाडीच्या १८० ते २०० जागा निवडून येतील आणि आमचंच सरकार स्थापन होईल, असंही मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे.
Bamarati Vidhan Sabha ( Marathi News ) : "बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव होईल. कारण अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत, अजित पवारांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मत आहे. बारामती तालुका काय एवढा सोपा नाही. राज्याचं नेतृत्व केलेला हा तालुका आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे," असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी केला आहे.
उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यानंतर काल मतदानादरम्यान जानकर यांनी अजित पवार पराभूत होतील, असा दावा केला आहे. तसंच राज्यात महाविकास आघाडीच्या १८० ते २०० जागा निवडून येतील आणि आमचंच सरकार स्थापन होईल, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
"राम सातपुतेंचं डिपॉजिट जप्त होणार"
माळशिरस मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर असा सामना रंगत आहे. या लढतीत माझा विजय होईल आणि राम सातपुते यांचं डिपॉजिट जप्त होईल, असं उत्तम जानकर यांनी म्हटलं आहे. "या तालुक्यासाठी माझा अनेक वर्षांचा संघर्ष आहे. हा तालुका विकासामध्ये आणखी पुढे जावा, यासाठी यंदाच्या निवडणुकीत मला एक ते दीड लाखांचं मताधिक्य मिळणार आहे. भाजपने केलेलं काम आणि माळशिरसच्या विद्यमान आमदाराने या मतदारसंघात केलेल्या उद्योगांमुळे त्यांचं या निवडणुकीत डिपॉजिट जाणार आहे," अशा शब्दांत जानकर यांनी राम सातपुते यांची खिल्ली उडवली.