पुणे: लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेच्या निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. १४ जुलैला बारामतीत त्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत.
अजित पवार यांनी नुकतीत मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांसमवेत सिद्धीविनायक मंदिराची भेट घेतली. त्यावेळी त्यांनीच या नियोजनाची माहिती दिली. त्यानंतर राज्यातील सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात आले आहे. मिशन हायस्कूलच्या मैदानावर १४ जुलैला दुपारी १ वाजता ही सभा होणार आहे. जनसन्मान महामेळावा असे या सभेचे नामकरण करण्यात आले आहे. पक्षाचे खासदार प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार यांच्यापासून ते राज्यातील सर्व आमदार, मंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या सभेपासून पुढे विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या दौऱ्याबाबत कळवण्यात आले असून त्यावेळी पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात यावे अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत बारामती या घरच्या मतदारसंघात झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर फक्त ८ च दिवसात त्यांनी निवडणुकीतील पराभूत उमेदवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा या राज्यसभेची उमेदवारी देत खासदारकी बहाल केलीच. त्यामुळेच आता तिथूनच राज्यदौऱ्याची सुरूवात ते जाणीवपूर्वक करत असल्याची चर्चा आहे. मतदारांना विश्वास देण्यासाठी म्हणून पराभवानंतरही तिथेच जाण्याचा व तिथूनच सुरूवात करण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे बोलले जात आहे.
प्रदेश शाखेकडून आम्हाला या मेळावा व जाहीर सभेबाबत कळवण्यात आलेले आहे. विधानसभा प्रचाराची सुरूवात या जनसन्मान महामेळाव्यातून होईल. जय परायज ही प्रत्येक निवडणुकीत आधीच ठरलेली गोष्ट असते. पराभव झाला म्हणून लोकांमध्ये जाण्याचे सोडू नका, तर तिथूनच पुन्हा सुरूवात करा असे संदेशच अजित पवार यांनी बारामतीमधील या नियोजित सभेतून दिला आहे.- दीपक मानकर- शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)