अजित पवार बारामतीतूनच लढणार?; जय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चेवरून पत्रकारांवरच भडकले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:49 AM2024-08-16T11:49:12+5:302024-08-16T11:51:59+5:30
बारामतीतील उमेदवार बदलाच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केल्याने आपण स्वत:च बारामतीतून लढणार असल्याचं अजित पवार यांनी सुचवल्याचं दिसत आहे.
NCP Ajit Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामती विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून केलेल्या वक्तव्याची राज्यभर मोठी चर्चा झाली. "बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही. जय पवार यांच्या कार्यकर्त्यांची मागणी असेल तर त्यांच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मात्र या मुद्द्यावर अधिक माहितीसाठी विचारणा केली असता आज ते पत्रकारांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं. बारामतीतील उमेदवार बदलाच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केल्याने आपण स्वत:च बारामतीतून लढणार असल्याचं त्यांनी सुचवल्याचं दिसत आहे.
जय पवार यांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या बातम्यांबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "मी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. प्रत्येक ठिकाणी मी बाईट द्यायला बांधिल नाही. कालच मी बघितलं की तुम्ही काहीही प्रश्न विचारता. तुम्ही विचारलं की अमुक-अमुक व्यक्ती बारामतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. त्यावर मी म्हटलं की, लोकशाहीत कोणालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. अगदी तुम्हीही निवडणूक लढवू शकता. पण तुम्ही बातमी काय चालवली?" असा प्रश्न विचारत त्यांनी पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, काल पुण्यात झालेल्या बैठकीविषयीही अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "बैठकीत काय घडलं हे प्रत्येकवेळी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.तुम्ही काहीही चर्चा कराल. त्या चर्चांवर उत्तर द्यायला मी काय बांधिल आहे का?" अशा शब्दांत त्यांनी काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीवर प्रतिक्रिया देणं टाळलं.
अजित पवार काल नेमकं काय म्हणाले होते?
"जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. त्यांना उमेदवारी देणार का?" असा प्रश्न पत्रकारांकडून काल पुणे इथं विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले की, "शेवटी लोकशाही आहे. मीही बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली असल्याने मला आता तिथून लढण्यास फार रस नाही. जय पवार यांना उमेदवारी देण्याकडे जनतेचा कल असेल तर पक्षाच्या पार्लामेंट्री बोर्डाकडून तोही विचार केला जाईल," असं अजित पवारांनी म्हटलं होतं.