'जनाई'च्या पाणी प्रश्नाबाबत ३० जानेवारीला बैठक घेऊन मार्ग काढणार- अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:28 PM2024-01-27T12:28:07+5:302024-01-27T12:29:20+5:30
सुपे ( पुणे ) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला ...
सुपे (पुणे) : शासनाच्या जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे. यासाठी मंत्रालयात ३० जानेवारीला शेतकरी संघर्ष कृती समितीच्या दहा जणांच्या शिष्टमंडळासह जलसंपदाचे अधिकारी आणि मी स्वत: उपस्थित राहुन बैठकीतून मार्ग काढू, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणस्थळी दिली.
मात्र २६ जानेवारीपासुन सुरु झालेले आमरण उपोषण आंदोलन ३० जानेवारीच्या बैठकिपर्यंत सुरुच ठेऊ. या बैठकीत उपोषण कर्त्यांचे समाधान झाले नाही तर आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे कृती समितीच्यावतीने यावेळी पवार यांना सांगण्यात आले. अजित पवार यांनी संध्याकाळी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकरी संघर्ष कृती समितीची भेट घेतली. यावेळी त्यांनी १२ मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पवार यांनी मार्गी लावल्या. तर हक्काचे २.१७ टीएमसी पाणी शेतकऱ्याला मिळावे. तसेच शेतकऱ्यांना हे पाणी तीन आवर्तनात देण्याविषयी चर्चा करण्यात आली. येथे अधिकारी नाहीत त्यामुळे मला त्याबाबत सांगता येणार नाही. आपण अधिकाऱ्यांसह कृती समितीतील १० जणाचे शिष्टमंडळाची बैठक मंत्रालयात घेऊ. येत्या ३० जानेवारीला तुम्ही मुंबईला या असे पवार यांनी सांगितले. टेलला असणाऱ्या शेतकऱ्याला पाणी मिळत नसेल तर तुम्हाला बंद पाईपलाईनमधुन पाणी देऊ, असे पवार यांनी सांगून कालवा सल्लागार समितीवर तीन सदस्य घेतले जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी पवार म्हणाले, कऱ्हा नदीवरील बंधाऱ्यांची दुरुस्तीसाठी ९० कोटींची तरतुद केली आहे. पुरंदरसाठी ६० कोटी मंजुर केले आहेत. जनाई चालु करुन ३० वर्ष झाले असून त्यांच्या विद्युत मोटारी, पंपाची दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी ४० कोटीची आवश्यकता असुन येत्या फेब्रुवारीच्या पुरवणी यादीत मंजुर करता येईल असे पवार यांनी सांगितले. सद्या आपण शिंदे सरकारामध्ये असल्याने आणि केंद्रातील मोदी सरकारचा पाठींबा असल्याने आपली विविध विकासकामे मार्गी लागत आहेत.