बारामती : हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते आहेत. त्यांना नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फेडरेशनच्या चेअरमनची जबाबदारी दिली आहे. माझं आणि पाटील यांचे फोनवर बोलणे झाले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेचा ‘शब्द’ मागितला आहे, या माध्यमांच्या प्रश्नावर सुपे येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांचा फोटो वापरण्याबाबत बंदी घातली आहे, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आम्ही वेगळी भूमिका घेतल्यावर समोरुन त्यांनी माझा फोटो वापरल्यास ॲक्शन घेऊ असे सांगितले. त्यांनतर आम्ही त्यांचा फोटो वापरणे बंद केले. आम्ही सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून लोकांसमोर जातो. नुकत्याच बारामतीत झालेल्या मेळाव्यातदेखील त्यांचा फोटो वापरला नाही. यासंदर्भात कोणी वापरला असेल तर माहिती नाही. हयात व्यक्तीचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनेच असतो, याबद्दल दुमत नसल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज
आमदार नीलेश लंके स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांच्याबरोबर बुधवारी (दि १३) चर्चा झाली. त्यांनी महायुतीमधील मंत्रीमहोदयांबाबत तक्रार केली. त्यासाठी लवकरच लंके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपण बैठक घेणार आहे. यावेळी संबंधित मंत्रीमहोदयांनादेखील बोलावून त्यांच्यात आपसात झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे चुकीचे काही न करण्याबाबत लंके यांना सूचित केले आहे. आता ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांना आता ते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आहेत. त्यांना पक्षाचा व्हीप लागू झाला आहे. त्यांना वेगळी भूमिका घ्यायची झाल्यास आमदारकीचा राजीनामा देऊन करावे लागेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. परंतु बातम्या जोरात सुरू आहेत. त्यात समोरच्या लोकांना उमेदवार नाही. मागील २ जुलैला आपण सत्तेत सहभागी झाल्यानंतर विरोधी गटाने आमच्यातील एकाला परत न घेण्याची भूमिका घेतली होती. ते बोलून सहा महिनेच उलटले आहेत. तोपर्यंत ‘नीलेश आमचाच’ अशी सुरुवात झाली आहे. त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे ही लोकशाही असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
...मित्रपक्षांच्या बैठकीसाठी
चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार महायुतीमध्ये कोणाला त्रास होऊ नये,कोणी दुखावला जाणार नाही. यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोणाला काही सांगायचे असल्यास त्यांनी त्यांच्या मित्रपक्षांना सांगावे. महायुतीच्या मित्रपक्षांची चंद्रकांत पाटील यांनी पुणे बारामती, शिरुरमध्ये बैठका घेण्यास पुढाकार घेतला आहे. मित्रपक्षांच्या बैठकीस सुरुवात केली आहे. ते सर्वांशी बोलत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, मागील निवडणुका आणि यंदाच्या निवडणुकीत फरक आहे. यावेळी धनुष्यबाण, कमळ, घड्याळ एका बाजूला आहे. बाकी आमच्या विरोधात असल्याचे पवार म्हणाले.