अजित पवार बारामतीत 'पॉवर' दाखवणार; बालेकिल्ल्यातूनच विधानसभेचं रणशिंग, सभेला कोण-कोण असणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 01:12 PM2024-07-14T13:12:23+5:302024-07-14T13:12:47+5:30
बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांनी तब्बल ४८ हजार मतांची आघाडी घेतल्याने अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.
Baramati NCP Rally ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला उभारी देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रणनीती आखली असून आज बारामतीत राष्ट्रवादीची जाहीर सभा पार पडणार आहे. जनसन्मान रॅली या नावाने राष्ट्रवादीकडून या सभेचं आयोजन करण्यात आलं असू या सभेला अजित पवार यांच्यासह पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि राज्य मंत्रिमंडळात असलेले राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. मात्र या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी दारूण पराभव केला. बारामती विधानसभा मतदारसंघातूनही सुळे यांनी तब्बल ४८ हजार मतांची आघाडी घेतल्याने अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची पुन्हा ताकद निर्माण करण्यासाठी अजित पवार यांनी रणनीती आखली असून आज बारामतीतूनच विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे.
कसं आहे सभेचं नियोजन?
राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. या सभेपासून पुढे विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवार संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक जिल्ह्याला त्यांच्या दौऱ्याबाबत कळवण्यात आले असून त्यावेळी पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत बारामती या घरच्या मतदारसंघात झालेला पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर फक्त आठच दिवसात त्यांनी निवडणुकीतील पराभूत उमेदवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा या राज्यसभेची उमेदवारी देत खासदारकी बहाल केलीच. त्यामुळेच आता तिथूनच राज्यदौऱ्याची सुरूवात ते जाणीवपूर्वक करत असल्याची चर्चा आहे. मतदारांना विश्वास देण्यासाठी म्हणून पराभवानंतरही तिथेच जाण्याचा व तिथूनच सुरूवात करण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे बोलले जात आहे.