अजितदादांची अनुपस्थिती अन् चर्चांना उधाण; पण टोपेंनी सांगितलं यामागचं नेमकं 'कारण'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 04:30 PM2021-05-28T16:30:59+5:302021-05-28T16:32:03+5:30
दर आठवड्याला न चुकता ज्या बैठकीला अजित पवार हजेरी लावतात त्या पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला आज चक्क ते गैरहजर राहिले आहेत.
पुणे : पुण्यात दर शुक्रवारी होणाऱ्या कोरोना बैठकीकडे सर्व पुणेकरांचेच लक्ष लागलेले असते. अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत दर शुक्रवारी ही आढावा बैठक आयोजित केली जाते. या बैठकीचे केंद्रबिंदू असतात ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार. या बैठकीत ते लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुणे, पिंपरी आणि जिल्ह्याचा हालहवाल जाणून घेत अनेक निर्णय जाहीर करतात. पण आजची कोरोना आढावा बैठकीला अजित पवारांची अनुपस्थिती सुरुवातीलाच उपस्थितांच्या भुवया उंचावून गेली. नेमकं काय कारण असेल की अजितदादांनी या बैठकीला गैरहजेरी लावली याबाबत कुजबुज सुरु झाली. पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अजित पवारांच्या अनुपस्थितीमागचं 'नेमकं कारण' सांगितलं आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
दर आठवड्याला न चुकता ज्या बैठकीला अजित पवार हजेरी लावतात त्या पुणे जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीला आज चक्क ते गैरहजर राहिले आहेत. विशेष म्हणजे अचानक पुण्यात आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही बैठक घेतली आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालक मंत्री अजित पवार हे शुक्रवारी किंवा शनिवारी बैठक घेतात. त्यानुसार आज देखील या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात जीएसटी बाबत असलेल्या बैठकीला हजेरी लावून अजित पवार हे दोन वाजता कोरोना आढावा बैठक घेणार होते. त्यापाठोपाठ वारी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पुण्यात असुनही या बैठकीला अजित पवार आलेच नाहीत. त्याऐवजी अचानक पुण्यात आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही बैठक घेतली.
अजित पवार हे सकाळी जीएसटी संदर्भातील बैठकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात होते. ही बैठक लांबल्याने पवार विभागीय आयुक्त कार्यालयातील कोरोना आढावा बैठकीला आले नाहीत असं सांगितले जात आहे.