पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमताच्या जोरावर भाजपाच्या वतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे, एका मिनिटात बजेट मंजूर केले जाते, विरोधकांची कामे होऊ दिली जात नाहीत, विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. नगरसेवकांचे निलंबन केले जाते, ही बाब चुकीची आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. महापालिकेत सत्ता येऊन सहा महिने झाले, महापालिकेत काही अच्छे दिने आले नाही, याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथून लावून भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. विकास करूनही महापालिकेतील सत्ता गेल्याने पवार हे काही महिने शहरात फिरकले नव्हते. भाजपाने सत्ता येऊनही विकास कामे दिसत नसल्याच्या तक्रारी पदाधिकाºयांनी केल्यानंतर महापालिका भवनात आज बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भाजपाच्या कारभारवर टीका केली.
पवार म्हणाले, ‘‘कामे करूनही महापालिका निवडणूकीत अपयश आले, याची खंत वाटते. शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी किती वेळा वेळ दिला आणि किती प्रश्न सुटले. भाजपा वरिष्ठ नेत्यांना शहराचे देणे-घेणे नाही. महापालिकेत कोणाचा पायपूस नाही, याविषयी नाराजी व्यक्त केली. कोण कसे वागते? यावरही भाजपाच्या बैठकीत नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. आमदार, खासदारांनी किती प्रश्न धसास लावले. त्यांना फक्त प्रश्नांचे राजकारण करण्यातच रस आहे. महापालिकेत विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे.’’
अनधिकृत बांधकामे सुरूच-
पवार म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात धोरण केले जात असताना शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यात प्रशासन कमी पडत आहे. सर्वच परिसरात बांधकामे सुरू आहेत. हे प्रशासनानेही मान्य केले आहे. महापालिका प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. काही लोकांचे वाचवायचे आणि काहींवर कारवाई करायची, कारवाईतही भेदभाव केला जातो. ही बाब खपवून घेतली जाणार नाही.’’
मेट्रो पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती कमी-
पवार म्हणाले, ‘‘पुण्याच्या एका खासदारामुळे मेट्रो तीन वर्षे रखडली. त्यामुळे कोट्यांवधींचे नुकसान झाले आहे. त्यानंतर नागपूर मेट्रोला मंजूरी मिळाली. ती सुरूही होईल. अजून पुणे मेट्रोला गती नाही. पुणे मेट्रो स्वारगेट ते पिंपरी अशा न करता थेट निगडीपर्यंत न्यावी. हे काम पहिल्या टप्यातच करावे.