पुणे : निवडणुकीसाठी राज्य सरकारने केलेला कायदा न्यायालयात टिकला नाही तर लगेचच निवडणुका होऊ शकतात. तसेच निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार आहेत. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे गाफील राहू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar on muncipal election) यांनी केले आहे. महापालिका निवडणुका पुढे जाणार किंवा दोन सदस्यीय प्रभाग रचना होणार, या सगळ्या वावड्यांना अजित पवार यांनी ‘ब्रेक’ दिला आहे.
अप्पर डेपो येथे पुणे महानगरपालिकेच्या (pmc) माध्यमातून उभारलेल्या माणिकचंद नारायणदास दुगड हॉस्पिटलचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी स्पष्टीकरण देतानाच सर्वच वावड्यांना ‘ब्रेक’ लावला आहे.
पवार म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. यासाठी राज्य सरकारने एकमताने कायदा तयार केला. त्या अध्यादेशावर राज्यपालांनीदेखील स्वाक्षरी केली आहे. परंतु, हा कायदा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर राज्य निवडणूक आयोग केव्हाही महापालिकांची निवडणूक जाहीर करू शकते. तसेच दोनचा प्रभाग होणार, अशा वावड्या कोणी उठवल्या असे म्हणत आगामी निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले.