...तर पुढील ५ वर्ष काही कमी पडू देणार नाही; अजित पवारांचं इंदापूरकरांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 01:27 PM2024-02-25T13:27:16+5:302024-02-25T13:29:48+5:30

विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे असं सांगत अजित पवारांनी आपल्या विचाराचा खासदार बारामतीतून पाठवण्याचं आवाहन केले.

Ajit Pawar's appeal to the people, elect the ruling party MP from Baramati | ...तर पुढील ५ वर्ष काही कमी पडू देणार नाही; अजित पवारांचं इंदापूरकरांना साकडं

...तर पुढील ५ वर्ष काही कमी पडू देणार नाही; अजित पवारांचं इंदापूरकरांना साकडं

इंदापूर - केंद्रात आपल्याला सरकार आणायचंय आणि त्यासाठी इथला खासदार केंद्र सरकारच्या विचाराचा हवाय. केंद्र सरकारकडून मतदारसंघात निधी आणायचंय. अनेक कामे मंजूर करून घ्यायची आहे. २ मार्चला बारामतीत नमो महारोजगार मेळावा घेतोय, देशपरदेशातील कंपन्या येतात. मला जे जे काही तुमच्यासाठी करता येईल ते ते करायचे आहे. त्यात मी कुठेही कमी पडणार नाही. पण तुम्ही लोकसभेच्या मतदानाला घड्याळाचं बटण दाबा. त्यात कुठेही कमतरता आणू नका. तुम्ही जितकं भरभरून मतदान कराल तितके पुढच्या ५ वर्षात काही कमी पडू देणार नाही हा शब्द आहे असं आवाहन अजित पवारांनी घातली. 

इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसनं मेळावा घेतला, त्यात अजित पवार म्हणाले की, सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण करतोय. देशाचे नेतृत्व सक्षम नेत्याच्या हाती आहे हीच गॅरंटी आहे. देशाची वाटचाल पुढे असताना विकासाची पूर्ती करणारे सरकार आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्य वाटप केले जाते. वेगवेगळ्या योजना गरिबांसाठी कार्यन्वित आहे. ४ कोटी लोकांना घरे बांधण्याचा कार्यक्रम करणार आहेत. राजकारण कुठल्या स्तरावर न्यावे याचेही भान काहींना राहिले नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे. सकाळपासून उशिरापर्यंत काम करण्याची ताकद आहे. देशात राष्ट्रीय महामार्ग झालेत, पूर्वी असं होत नव्हते. वंदे भारत ट्रेन सुरू झालीय. कमी वेळात कुठेही जाता येते. आपला लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा गेला तर केंद्र सरकार कितीतरी जास्त पटीने निधी देऊ शकते. हक्काने मोदींना सांगू शकतो. तुमच्या विचारांचा खासदार दिलेला आहे. आता मतदारसंघात हे काम करून द्या असं अजित पवारांनी म्हटलं. 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात मदत कशी करता येईल असं आम्ही बघत होतो. आम्ही जो निर्णय घेतला तो संघटनेच्या आणि तुमच्या पाठबळावर घेतला आहे. विरोधकांमध्ये एक वाक्यता नाही. चार दिशेला चार तोंड आहे. मतदारांमध्ये खूप ताकद आहे. कुठेही भावनिक होऊ नका. मला सगळ्या गोष्टींची जाण आहे. कुठल्याही कामासाठी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाचा काळ असतो. चार दिवस सासूचे असले की चार दिवस सूनेचे येतात, आता सासूचे दिवस गेले सूनेचे दिवस आले अर्थात तुम्ही बटण दाबलं तर..विरोधाला विरोध म्हणून राजकारण करायचे नाही असंही त्यांनी सांगितले. 

Web Title: Ajit Pawar's appeal to the people, elect the ruling party MP from Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.