जेजुरी : जेजुरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामांना त्वरित निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिल्याची माहिती जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी माहिती दिली.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तिर्थक्षेत्र जेजुरीच्या ३५६.६९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला शासनाने मंजुरी दिली असून या विकास आराखड्याअंतर्गत होणाऱ्या विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासंदर्भात आज सकाळी पुणे विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे, विश्वस्त अशोक संकपाळ, संदीप जगताप, राजकुमार लोढा, पंकज निकुडे यांच्यासह एक बैठक घेतली. बैठकीत जेजुरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात चर्चा झाली.
यावेळी जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून खंडोबा मंदिर तसेच कडेपठार मंदिर परिसर, मंदिरांची डागडुजी, दुरुस्ती, येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधा, प्रसाधन गृहे, दिव्यांग भाविकांसाठी रस्ता, पिण्याचे पाणी, दुकानांची सुनियोजित व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन, योग्य वायुविजन, शहरांतर्गत रस्ते, वाहनतळ, बाह्यवळन रस्ता, कर्हा स्नान घाट, पालखी मार्ग विकसित करणे, आपत्कालीन मार्ग सुधारणा, आदी कामे होणार आहेत.
आराखड्यानुसार तीन टप्प्यात ही सर्व कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दोन्ही मंदिर परिसर व दुरुस्त्यांची कामे होणार आहेत. भाविकांसाठी सोयी सुविधा यासाठी सुमारे १०९ कोटींचा निधी आवश्यक आहे. हा निधी तात्काळ उपलब्ध करून देणार असल्याचे आस्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याने तीर्थक्षेत्र जेजुरीचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार असल्याचे नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले.