अजित पवारांची मतदार संघात बेरजेची गणिते; जाचक पितापुत्रांसमवेत ‘डिनर डिप्लोमसी’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:16 PM2024-05-06T18:16:06+5:302024-05-06T18:16:42+5:30
आता महायुतीपासून अंतर राखून असलेल्या सहकारातील अभ्यासू नेते पृथ्वीराज जाचक यांची भेट घेत त्यांनी रविवारी (दि ५) त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले....
बारामती : मतदानासाठी ४८ तास उरलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘अभी नही तो कभी नही’ या राजकीय व्यूहरचनेद्वारे त्यांनी राजकीय बेरजेची गणिते आखण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना आपलेसे केले. त्यानंतर, महाविकास आघाडीकडे झुकलेल्या प्रवीण माने यांना देखील महायुतीच्या प्रचारात सामील करून घेण्यात ते यशस्वी ठरले.
आता महायुतीपासून अंतर राखून असलेल्या सहकारातील अभ्यासू नेते पृथ्वीराज जाचक यांची भेट घेत त्यांनी रविवारी (दि ५) त्यांच्यासमवेत स्नेहभोजन केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांच्यासमवेत जाचक यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र कुणाल जाचक यांची भेट घेत त्यांनी चर्चा केली. जाचक पितापुत्र महायुतीच्या प्रचारात त्यांनी सहभागी होण्यासाठी ‘दादां’ची ‘डीनर डिप्लोमसी’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे लोकसभेसह आगामी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जाते.
सुरुवातीला १७ फेब्रुवारीला राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी त्यांचे पुत्र कुणाल जाचक यांच्यासमवेत गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे इंदापूर तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे होती. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेरजेचे राजकारण करण्यास सुरुवात केल्याचे संकेत या भेटीद्वारे मिळाले होते. त्यानंतर, सुनेत्रा पवार यांनीही २५ फेब्रुवारीला जाचक यांची भेट घेतली होती. मात्र, जाचक दोन्ही गटांपासून अंतर राखून होते. त्यानंतर, रविवारी (दि. ५) महायुतीच्या प्रचार सांगता सभेत ते प्रथमच सहभागी झाले.त्याच दिवशी रात्री जाचक यांच्यासमवेत त्यांच्या घरी स्नेहभोजन घेत जुन्या राजकीय वादाला पूर्णविराम दिल्याची चर्चा आहे.
५५ वर्षांच्या राजकारणात पवार कुटुंब आणि पक्षात फूट झाल्याने संपूर्ण लोकसभा मतदारसंघात नवीन राजकीय गणिते नव्याने उदयास आली आहेत. मतदानापूर्वी काही तास अगोदर उपमुख्यमंत्री पवार यांनी जाचक यांच्याशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रचाराच्या सांगता सभेनंतर वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. लोकसभा मतदारसंघावर पकड मजबूत करण्यासाठी आवश्यक गणिते जुळविण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले आहे. बारामती तालुक्यातील कट्टर राजकीय विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांच्याशी महायुतीच्या माध्यमातून यापूर्वीच अजित पवार यांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे मतदारसंघातून विरोधक आपलेसे करण्यासाठी अजित पवारांनी आखलेली रणनीती चर्चेची ठरली आहे.
२००३ मध्ये कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी गळीत हंंगामाच्या काळात डावलले जात असल्याच्या भावनेतून पृथ्वीराज जाचक अजित पवार यांच्यापासून दूर झाले होते. त्यानंतर, जाचक यांनी भाजपमधून त्यावेळी थेट शरद पवार यांच्याविरोधात २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यानंतर, जाचक हे राष्ट्रवादीपासून अंतर ठेवून होते. २०२० मध्ये जाचक यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा होऊन समेट घडला. २०२०च्या गळीत हंगामापासून छत्रपती कारखान्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयात, कारभारात जाचक यांनी लक्ष घातले. मात्र, ऑक्टोबर २०२१ मध्ये संचालक मंडळ आणि जाचक यांच्यात वाद झाला. या कारखान्यात अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे संचालक मंडळाबरोबर मतभेद झाल्यानंतर २०२१ मध्ये पुन्हा जाचक राष्ट्रवादीपासून म्हणजेच अजित पवार यांच्यापासून दूर झाले. मात्र, आता अजित पवार आणि जाचक पुन्हा एकत्र आल्याचे पाहावयास मिळत आहे.