"आपल्या लोकांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या", अजित पवारांचा जयंत पाटलांना फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:37 PM2023-02-02T14:37:39+5:302023-02-02T14:37:48+5:30
कसब्यात तीन वेळा निवडणूक लढवली आहे तर आता का नाही लढवायची
पुणे : कसब्याच्या पोटनिवडणुकीला आता अवघे काहीच दिवस राहिले आहेत. तरीही काँग्रेसची काहीच हालचाल दिसत नाही. मग आपली तिथे ताकद आहे, तीन वेळा निवडणूक लढवली आहे, आताही आपली तयारी आहे तर निवडणूक का लढवायची नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना गुरूवारी दुपारी नेते अजित पवार यांच्याकडे व्यक्त केल्या. पवार यांनी तिथूनच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करून कार्यकर्त्यांचे म्हणणे वर मांडा व लवकर निर्णय घ्या असे सांगितले.
कसबा विधानसभेची पोटनिवडणुक २६ फेब्रुवारीला होत आहे. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवायची किंवा कसे याबाबतीत अजूनही काहीच निर्णय झालेला नाही. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे आहे, मात्र त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासंबधी कोणताही ठोस हालचाल दिसायला तयार नाही. आघाडीची म्हणून एकही बैठक झालेली नाही. मात्र काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनीही पवार यांच्याकडे मागणी करत आपणच निवडणूक का लढवू नये असा प्रश्न केला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, पक्षाचे माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार बैठकीला उपस्थित होते. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने तीन वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवली होती. तिथे पक्षाचे काम आहे, ताकद आहे. निवडणूक जिंकण्याची संधी आहे असे मत यावेळी इच्छुकांनी व्यक्त केले.
पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. मागील वेळच्या विधानसभा पोटनिवडणुकीची माहिती घेतली. महाविकास आघाडी आहे, एकत्रित बैठक होईल, त्यात निर्णय होईल असे सांगत पवार यांनी बैठकीतूनच प्रदेशाध्यक्ष पाटील यांना फोन लावला व इच्छुकांचे म्हणणे त्यांना सांगितले. काँग्रेस व शिवसेना यांच्याबरोबर एकत्रित बैठक आयोजित करून त्यात काय तो निर्णय घ्यावा असे त्यांनी पाटील यांना सांगितले.