पुणे - मनसेप्रमुख राज ठाकरे राजकारणी म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. पण, व्यंगचित्रकार म्हणूनही सर्वपरिचीत आहेत. आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून ते अनेकदा राजकीय घडामोडींवरही भाष्य करतात. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावरही त्यांनी कार्टुनच्या माध्यमातून जबरी प्रहार केला होता. नुकतेच, पुण्यातील कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्यावतीने आयोजित व्यंगचित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त राज ठाकरेंनी या प्रदर्शनातही आपला कुंचला चालवला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्याचं चित्र साकारलं.
राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेतेही या निर्णयाला विरोध करत आहेत. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाचं समर्थन करत कार्यकर्त्यांनाच सुनावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, अजित पवार हेच सध्याच्या घडामोडीत केंद्रस्थानी आहेत. मग, राज ठाकरेंनी व्यंगचित्र दिनानिमित्त कलाकारांच्या आग्रहाखात अजित पवार यांचंच चित्र रेखाटलं. सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारं एखादं कार्टुन काढा, असा आग्रह येथील कलाकारांनी केला होता. त्यावर, राज यांच्या कुंचल्यातून अजित पवार प्रकटले.
शांत आणि गप्प बसलेले, नजरेतून आपला रोख दर्शवणारे अजित पवार रेखाटले आहेत. यावेळी, कलाकारांनी राज ठाकरेंना चित्रासोबत एखादं कॅप्शन लिहिण्याची विनंती केली. त्यावर, राज यांनी आता काय लिहू तुम्हीच सांगा? गप्प बसा असे लिहू का? असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. त्यावर, उपस्थितांनी टाळ्या वाजवून राज यांना दादा दिली. दरम्यान, मला उभे राहून व्यंगचित्र काढायची सवय नाही, त्यामुळे अजित पवार जसे पाहिजे, तसे जमले नाहीत. मला बाळासाहेबांसारखीच एका जागी बसून व्यंगचित्र काढण्याची सवय आहे. म्हणून, जे आहे ते गोड मानून घ्या, असेही राज यांनी म्हटलं.