'तडीपार करूनही सुधारला नाही तर मोका लावू', अजित पवारांचा गुन्हेगारांना स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 02:58 PM2022-06-04T14:58:28+5:302022-06-04T15:00:01+5:30
गुंडांना शिक्षा होणारच...
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची सार्वजिक सुरक्षितता सरकारची जबाबदारी आहे. गुन्हगारांची गय केली जाणार नाही. सर्वांना सुरक्षित जगता आले पाहिजे. जो गुंडगिरी करत असेल, दहशत करत असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर चार - पाच गुन्हे दाखल झाले असतील तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही तो सुधारला नाही तर थेट मोक्का लावू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे दिला.
पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, प्रदेशचे रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, जगदीश शेट्टी, भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते.
कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी कडवट बोलतो पण, व्यवहार्य बोलतो. आम्हाला कोणाला विनाकारण त्रास द्यायचा नाही. मात्र, कोणाची गुंडगिरीही खपवून घेतली जाणार नाही. महिलांनी निर्भयपणे फिरावे, असे वातावरण हवे. ’’
कमीशन मिळेल त्यांचाच विचार भाजपाने केला
‘‘पाच वर्षे महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या भाजपने केवळ स्वार्थाचे विषय मार्गी लावले. 'कमिशन' जास्त कसे मिळेल, याचा विचार केला. घरचा पैसा असल्यासारखी उधळपट्टी करत शहर बॅकफुटवर गेले. सहा कोटी रूपये खर्चुन कुत्र्यांची नसबंदी केली. नसबंदीसाठी सोन्याची उपकरणे वापरलीत काय, श्वानांच्या नसबंदीत कमिशन मिळविले, असा प्रश्न पवार यांनी केला.
ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार
पवार म्हणाले, ‘‘भाजपला पाच वर्षात आंद्रा, भामा - आसखेड धरणातून पिंपरी - चिंचवडकरांकरिता पाणी आणता आले नाही. ज्यांच्या अंगातच पाणी नाही ते काय रोज पाणी देणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० नगरसेवक निवडून द्या शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा करु, मी शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करणार नाही. प्रश्न सोडविण्याची धमक, ताकद आमच्यात आहे. अन्यथा अजित पवार नाव सांगणार नाही.’’